Join us

"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:43 IST

असं असलं तरी तिने महाराष्ट्रातील जनतेला मत देण्याचं आवाहन केलं आहे.

आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान होत आहे. प्रत्येक जण मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर पडत आहे. मत दिल्यानंतर मित्रपरिवारासोबत सेल्फीही पोस्ट करत आहे. जणू काय एखादा सणच ज साजरा होत आहे. सेलिब्रिटीही मत देण्यासाठी सामान्यांसोबत रांगेत उभे आहेत. दरम्यान एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत ती यावेळी मतदान करु शकणार नाही असं म्हणाली. असं असलं तरी तिने महाराष्ट्रातील जनतेला मत देण्याचं आवाहन केलं आहे.

ही अभिनेत्री आहे मिथिला पालकर (Mithila Palkar). मिथिला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आज सगळे मतदानासाठी बाहेर पडले असताना मिथिला मात्र मतदान करु शकणार नाही असं म्हणाली. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "मी यावेळी मत देऊ शकत नाही. दुर्दैवाने वेळच चुकीची आहे. पण महाराष्ट्र...कृपया जमलं तर तुम्ही नक्की करा. आपल्यासाठी मत द्या. आपण आणखी चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत."

मिथिलाने तिच्या पोस्टमध्ये कारण तर लिहिलेलं नाही मात्र सध्या ती परदेशात असल्याचं तिच्या आधीच्या स्टोरीवरुन दिसतं. ती सध्या नॉर्वेमध्ये आहे. कामानिमित्त किंवा सुट्टीसाठी ती तिथे गेल्याची शक्यता आहे. मात्र यामुळे मिथिला यावेळी मतदानापासून वंचित राहिली आहे.

दुसरीकडे मराठी तसंच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं. तसंच इतरांना मतदान करण्याचा सल्लाही दिला. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे, सायली संजीव, प्रिया बापट, उमेश कामत, मनवा नाईकसह अनेक कलाकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

टॅग्स :मिथिला पालकरमराठी अभिनेतामतदानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४