ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? ‘धर्मवीर’चा सीन अन् अमेय खोपकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:12 AM2022-06-28T11:12:32+5:302022-06-28T11:19:22+5:30
Ameya Khopkar, Dharmaveer : अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यात रोज नव्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात तरी विरणार नसल्याचं दिसत असताना आता या सत्तानाट्यात राज ठाकरे यांची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काल सोमवारी रात्री मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. ‘असा हा धर्मवीर... एक ‘राज’की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है...,’ असं त्यांनी आपल्या ट्विट म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटचे निरनिराळे अर्थ काढले गेले होते. काही क्षणांपूर्वी अमेय खोपकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मवीर चित्रपटातील एका सीन विषयी वक्तव्य केलं आहे.
अमेय खोपकर यांच्या पोस्ट...?
अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत . एका व्हिडीओत ‘धर्मवीर’ चित्रपट चित्रपटगृहात सुरू असताना आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यातील एक संवाद पाहायला मिळतो. या व्हिडीओत राज ठाकरे आनंद दिघेंना म्हणतात, ‘अहो धर्मवीर अजून हिंदुत्वाचं काम सर्वत्र पोहोचलेलं नाही’. यावर आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात, ‘ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे’. दुसरा व्हिडीओ ‘झी5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटाचा आहे. यात मात्र संवाद बदलेले दिसत आहे.
हे दोन्ही व्हिडीओ शेअर करत अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 28, 2022
‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय. pic.twitter.com/9fuL93LVCm
‘ खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. धर्मवीर जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय,’ असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध. pic.twitter.com/STYsekKnXg
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 28, 2022
याशिवाय अमेय खोपकर यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ‘धर्मवीर आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध’, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.