Join us

VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 9:35 AM

राज ठाकरे यांचं हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे.

1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयुष्यात पहिलं रिल केलं आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचं हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे.

राज ठाकरे यांनी रिल स्टार अथर्व सुदामेसोबत महाराष्ट्र दिनानिमित्त खास व्हिडीओ बनवला आहे. या रिलमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्व सांगितलं आणि  मराठी भाषा संवर्धनाविषयी भाष्य केलं. रिलमध्ये सुरुवातीला अथर्व सुदामे भाषणाची तयारी करताना दिसून येत आहे. यात राज ठाकरे यांची एन्ट्री होते आणि दोघांमध्ये महाराष्ट्र आणि मराठी भाषा यावर संवाद होते. रीलमध्ये अथर्व म्हणतो आहे, '1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली, ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची.. ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती यांनी खरंतर महाराष्ट्र घडवला'. 

राज ठाकरे यांची व्हिडीओमध्ये एन्ट्री होते आणि ते अथर्वला विचारतात, 'काय अथर्व कधी आलास, काय चाललंय?'. त्यावर अथर्व उत्तर देतो, '1 मे निमित्त जरा छोटंस भाषण आहे. ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय'. यावर राज ठाकरे म्हणतात, 'भाषण पाठ करतोय..बघू... संयुक्त महाराष्ट्र, टिळक, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, पु.ल.देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर व्हा छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहेस', असं म्हणत त्याचं कौतुक करतात. यावर अथर्व त्यांना 'साहेब यात काही बदल" असं विचारतो. 

राज ठाकरे म्हणतात, 'बदल काही नाही.. उत्तम आहे हे...परंतु आपण आज काय करतोय ना ते देखील सांगणं गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कतृत्व गाजवलं, महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. मला असं वाटतं त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे. समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावर आपण गरंगळत जाऊन हिंदी बोलतो. त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही'.

यावर अथर्व म्हणतो, 'खरं आहे साहेब... ससा तो ससा की कापूस जसा हे शिकलं पाहिजे. बहात्तर आणि अठेचाळीस  म्हणता आणि वापरता आलं पाहिजे.  कारण आपण येत नाही म्हणून वापरत नाही. वापरत नाही तर गरज नाही असं वाटतं'. यावर राज ठाकरे म्हणतात, 'हा अभिमान आणि स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला छोटासा खारीचा वाटा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तु जे चांगलं काम करतो आहेस. चांगले करतो आहेस.  माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत'. राज ठाकरेंनी अथर्वला शुभेच्छा दिल्यानंतर बॅकग्राऊंडला 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं वाजतं. सध्या हे रिल चांगलचं  चर्चेत आलं आहे

टॅग्स :राज ठाकरेसेलिब्रिटीसोशल मीडियाराजकारणमहाराष्ट्र