ट्रेंडनुसार माधुरीच्या बकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 9:01 AM
धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करतेय. मात्र हा चित्रपट मराठी असला तरी मराठी ...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करतेय. मात्र हा चित्रपट मराठी असला तरी मराठी प्रेक्षकांना हा फारसा भावणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रेंडनुसार हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या पचनी पडणारा नाहीय. बकेट लिस्ट या चित्रपटाबाबत सगळीकडे नकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे माधुरीचे मराठीतील पदार्पण प्रेक्षकांना किती भावेल यावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवासांपासून तिचे चाहते तिच्या मराठीतील पदार्पणाची वाट बघत होते मात्र त्यांची काहीशी निराशा होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणी आऊट झाली आहेत. यात माधुरीची जोडी सुमीत राघवनसोबत जमणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे तर या कथेचं सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे. डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित बकेट लिस्ट या चित्रपटाची निर्मिती जमाश बापुना, अमित पंकज परिख, अरूण रंगाचारी, विवेक रंगाचारी,आरती सुभेदार आणि अशोक सुभेदार यांनी केली आहे. तर करण जोहर आणि ए. ए.फिल्म्स हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करीत आहेत.'बकेट लिस्ट' या चित्रपटात माधुरी पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे.पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर चित्रपटात दिसणार आहेत.