Join us

मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:40 PM

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय

आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडतोय. या चौथ्या टप्प्यात मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी अशा भागांत मतदान पार पडत आहे. सामान्य माणसांपासून दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेक कलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

मोहन आगाशेंनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावताना आलेला अनुभव शेअर केलाय. मोहन आगाशे म्हणतात, "आमच्या भागातून ३५ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे ५ मिनिटं मशीन वाचण्यातच गेली. माणसागणिक पार्ट्या झाल्या आहेत." याशिवाय पुढे मोहन आगाशेंनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय. 

मोहन आगाशे म्हणतात, "मतदानाबाबत जनजागृती केली पाहिजे. लोकांनी काय केलं पाहिजे हे मी सांगू शकत नाही. पण निदान आपलं काम चोख पार पाडलं पाहिजे. तरच आपला देश सुधारेल." असं मोहन आगाशे म्हणाले. मोहन आगाशे यांनी 'जैत रे जैत', 'देऊळ', 'अस्तु', 'अब तक छप्पन' अशा अनेक हिंदी - मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :मोहन आगाशेनिवडणूकलोकसभाशिरुरशिर्डीपुणेमावळ