ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale ) यांचं शनिवारी दीर्घ आजारानं निधन झालं. याच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale ) हिने एक पोस्ट शेअर केली आहे. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सखी गोखलेला अनेकांनी ट्रोल केलं. विक्रम गोखले हे सखीचे काका आहेत, असं समजून अनेकांनी काकांबद्दल एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे तिला फैलावर घेतलं. आता या तमाम ट्रोलर्सला सखीनं खरमरीत उत्तर दिलं आहे. विक्रम गोखले आणि माझे बाबा (मोहन गोखले) हे भाऊ नव्हते. त्यांच्या आणि आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. फक्त दोन कुटुंबात मैत्रीचं नातं आहे, असंही तिने स्पष्ट केलं आहे.
काय आहे सखीची पोस्ट?ठीक आहे... मला एकदा एक गोष्ट स्पष्ट करायची आहे.... विक्रम गोखले दिग्गज अभिनेते होते आणि लहान असतानापासून त्यांची पडद्यावरची जादू मी अनुभवली आहे. त्यांचं जाणं हे अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पण गोखले काका आणि माझे बाबा हे दोघेही भाऊ नव्हते. आमच्यात कोणतंही नातं नव्हतं. फक्त आमच्या दोन्ही कुटुंबात मैत्रीचं नातं आहे. इंटरनेटवरच्या प्रत्येक गोष्टींवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.
विकिपीडियाचा वापर करून तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालत असाल तर ती चूक तुमची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विक्रम गोखले यांचं माझ्याशी नातं असो की नको, मी त्यांच्याबद्दल पोस्ट करावी की नाही ही माझी चॉईस आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही म्हणून तुम्हाला दु:खच झालेलं नाही, असं म्हणता येणार का? विक्रम काका गेल्यानंतर मी एकही पोस्ट शेअर केली नाही, म्हणून मला असंख्य मॅसेज येत आहेत. मला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी माझ्याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. पण हा संताप व्यक्त करण्याआधी यामागचं खरं कारण काय, हे शोधा. माझ्यावर वेळ खर्च करण्यापेक्षा तोच वेळ ज्ञान मिळवण्यासाठी वा ज्ञान वाढवण्यासाठी वापरा. जेणेकरून तुमच्या मित्रांना व कुटुंबीयांना तुमची लाज वाटणार नाही...., अशा आशयाची इन्स्टा स्टोरी सखीनं शेअर केली आहे.
सखी ही अभिनेते मोहन गोखले यांची मुलगी आहे. सखीचे बाबा मोहन गोखले आज आपल्यात नाहीत. व्रिकम गोखले यांच्या निधनानंतर मोहन गोखले व विक्रम गोखले भाऊ होते, अशा आशयाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण मुळातच ही माहिती चुकीचं होती. सखीने अशी चुकीची माहिती पेरणाऱ्या व त्यावरून एखाद्याला ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.