मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेचसे कलाकार हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम करताना दिसतात. यापैकी एक नाव म्हणजे मोहन जोशी (Mohan Joshi). त्यांनी हिंदीत बरेच काम केले. त्यांनी साकारलेल्या काही खलनायकाच्या भूमिकाही खूप गाजल्या. मात्र त्यांनी कालांतराने हिंदी सिनेसृष्टीला रामराम केला. त्यामागचे कारण त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.
मोहन जोशी यांनी कांचन अधिकारी यांच्या बातों बातों में या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सांगितले की,''एके हंगल यांचे काय झाले, भारत भूषण, भगवान दादा यांना शेवटच्या दिवसात इंडस्ट्रीने बाजूला टाकलs. भगवान दादा अवॉर्ड स्वीकारताना तर म्हणाले होते की,''हाच जर अवॉर्ड मला आधी दिला असता तर माझ्या औषध पाण्याचा खर्च निघाला असता.'' त्यामुळे या इंडस्ट्रीबद्दल मनात एक तिढ बसली आहे. मी दिवसात दोन शिफ्ट करायचो पण यामध्ये अनेकदा तोचतोचपणा येऊ लागला. तिथल्या लोकांचा कंटाळा आला मला. त्या वातावरणाला कंटाळलो होतो. ती माणुसकी सोडलेली लोक आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची तिथे पद्धत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत काम करायचे नाही असे ठरवले.''
'गंगाजल'नंतर हिंदीतील काम थांबवले
यापूर्वी मोहन जोशींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी हिंदी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमरिश पुरी मला आवडायचे. त्यांच्यासोबत मी ६-७ चित्रपटात काम केले. त्यांच्यानंतर शक्ती कपूर, परेश रावल, किरण कुमार, मुकेश खन्ना हे त्या काळचे गाजलेले खलनायक. त्यांच्यासोबत माझी मैत्री झाली. एकत्र चित्रपट केले. पण, २००३ साली गंगाजल हा चित्रपट केल्यानंतर मी हिंदी चित्रपटातील काम ठरवून थांबवले. त्यानंतर जे पटले, रुचले तेच काम मी केले."