Join us

१२ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी केले 'पिप्सी' सिनेमाचे समीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 1:02 PM

लहान मुलांच्या भावविश्वाचा रंजक वेध घेणाऱ्या या सिनेमाचे समीक्षण चक्क लहान मुलांकडूनच केले जात आहे. 'फिल्म शाला' या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेतील विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवला जात आहे

ठळक मुद्देपिप्सी' या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेतदोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या 'पिप्सी' नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे

सिनेपत्रकारांकडून केल्या जाणा-या समिक्षणाद्वारे, प्रेक्षक चित्रपट पाहावा कि नाही याबद्दल विचार करत असतो. समिक्षकांद्वारे मांडण्यात येणाऱ्या चित्रपट निरीक्षणामुळेच अमुक सिनेमा गाजणार की पडणार याचा अंदाज वर्तविला जातो. मात्र, लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित 'पिप्सी' या सिनेमाच्या टीमद्वारे पहिल्यांदाच चित्रपट समिक्षणाची हटके संकल्पना चित्रपटसृष्टीत राबविण्यात येणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वाचा रंजक वेध घेणाऱ्या या सिनेमाचे समीक्षण चक्क लहान मुलांकडूनच केले जात आहे. 'फिल्म शाला' या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेतील विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवला जात आहे. 'बुक अ स्माईल' आणि 'एस. कुमार्स' यांच्या पुढाकाराने हा उप्रकम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात असून, त्याद्वारे 'पिप्सी' सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे निरीक्षण आणि मत विचारात घेतले जाणार आहे.

'फिल्म शाला' या उपक्रमांतर्गत, शाळेच्या प्राथमिक विभागात 'टायनी ट्वीट' द्वारे २०० अक्षरांमध्ये आणि माध्यमिक विभागात 'राईट व्ह्यू' द्वारे ५०० शब्दांमध्ये 'पिप्सी' सिनेमा कसा वाटला या विषयावर समीक्षण स्पर्धा घेतली जात आहे. त्यासाठी, अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य व लेखक कमलाकर नाडकर्णी हे परीक्षकाच्या भूमिकेत असून, त्यांच्याद्वारे निवडण्यात आलेल्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'फिल्म शाला' या स्पर्धेसाठी १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा यशस्वी सहभाग लाभला आहे. दोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या 'पिप्सी' नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून, संपूर्ण महाराष्ट्राला 'अ बॉटल फूल ऑफ हॉप' देण्यास यशस्वी होत आहे.