Join us  

"आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी...", सुव्रत जोशीने आईसोबत केली इंग्लंडवारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 9:49 AM

Suvrat Joshi : सुव्रत जोशी नुकताच आईसोबत इंग्लंडच्या ट्रीपला गेला होता. तिथले फोटो शेअर करत त्याने पोस्ट शेअर केलीय.

अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. अभिनयाबरोबरच सुव्रत त्याच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. तो सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान अलिकडेच तो आईसोबत इंग्लंडवारीला गेला होता. त्याने पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

सुव्रत जोशी याने इंस्टाग्राम इंग्लंडच्या ट्रीपचे फोटो शेअर करत लिहिले की, आईची इग्लंड वारी १. मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढवतानाही आई- बाबांनी,नेहेमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस आणि सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली. खिशाला खार लावून,धाडस करून उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपट आणि नाटक माझ्या बालपणाच्या ओंजळीत भरभरून ओतली. यात स्वतःच्या इच्छांना मुरड घातली. मी माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमावले त्याच्यात या बालपणी मिळालेल्या विविधरंगी अनुभवाच्या कंपास पेटीचा सिंहाचा वाटा आहे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही आई नेटाने, स्वाभिमानाने आयुष्याचा एक एक धागा विणत असते. यात आता तिला नवे अनुभव देण्यासाठी माझ्यावर राज्य आहे. असे वाटते की मला कामामुळे, कुतूहलाने प्रौढ आयुष्यात जे काही नवे अनुभव आले त्यात आई वडिलांना भागीदार करून घेता आले पाहिजे… आपल्या चष्म्यातून जे आता नवे जग आपल्याला दिसते त्याची चव त्यांनाही चाखून बघायला मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे. आता बाबा नाही पण म्हणून आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी तीव्र इच्छा होती. अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले. 

त्याने पुढे म्हटले की, आईच्या लंडनवारीची तयारी करायला घेतली. भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले. तिच्या पायाचे AI mapping करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले खरे, पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला. तिने आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते. आजवर याआधी तिने कधी बुटच घातले नाहीत. इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती. आयुष्यभर स्वतःचे पाय नेहमी जमिनीवर ठेवायची आणि आमचेही पाय जमिनीवर राहतील याची तिने कसोशीने काळजी घेतली. दिड इंच्याच्या त्या गुबगुबीत वेष्टनात छोट्या ढगांनी आपल्याला जमिनीपासून थोडे वर तोलून धरले आहे, असेच तिला वाटले असेल की काय? खडतर वाटेवर चटके खात प्रत्येक पाऊल निष्ठेने टाकले आहे तिने,तिच्या पायाची गरज पाहून तिला पुढचे पाऊल टाकायला मदत करणाऱ्या स्प्रिंग्जची चैन आता तरी मिळायला हवी. 

आधीच्या पिढीने साधं जगायची साधना केली...

तिला कौतुकाने आणि थोडी शायनिंग मारायला काळा चष्मा पण घेतला. फार चिकणी दिसते ती त्याच्यात. श्रीमंत, समवयीन, गोऱ्या पुरुषांना न कळताच ‘चेकआउट’ मारायची सोय करून घेतली तिने. आपल्या आधीच्या पिढीने साधं जगायची साधना केली. त्याचा प्रचंड आदर आहेच. ती मूल्य हरवू न देता त्यांनीही थोडं भोगावं… आणि त्यांना त्याची चोरी वाटू नये अशी तजवीज आपण त्यांच्यासाठी करावी. ट्रीप फार सुंदर झाली. त्याबद्दल पुढील काही पोस्ट मध्ये लिहीनच. तूर्तास एवढेच, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.

टॅग्स :सुव्रत जोशी