गानसम्राज्ञी, स्वरमाऊली, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाचा मुहुर्त साधत हृदयेश आर्ट्स द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित मीना मंगेशकर-खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विद्या-वाचस्पती शंकर अभ्यंकर, एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आनंद तेजावर, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, प्रकाशक आप्पा परचुरे, लेखक प्रवीण जोशी यांसमवेत इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्यांच्या कंठातच साक्षात सरस्वती विराजमान आहे अशा करोडो लोकांना आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक श्री. आप्पा परचुरे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक मंगेशकर कुटुंबाचा इतिहास अजरामर करणारं ठरेल यात काहीच शंका नाही.
'मोठी तिची सावली' या पुस्तका बद्दल सांगताना मीना मंगेशकर-खडीकर म्हणतात की, "आमची राधा सात वर्षांची असताना तिच्या एका कवितेचे मी ध्वनिमुद्रण केले होते. त्या कवितेचे शब्द होते, 'लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली.' बाबा गेल्या नंतर अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी दीदीने आम्हाला तिच्या सावलीत सामावून घेतलं. आणि म्हणूनच दीदीची जीवन कथा सांगणाऱ्या या पुस्तकाचे नावं मी 'मोठी तिची सावली असं ठेवलं. ही तिची सावली आम्हां सर्वांवर सतत अशीच राहु देत ही माझी मंगेशा चारणी प्रार्थना."
'मोठी तिची सावली' पुस्तक प्रकाशन सोहोळ्यादरम्यान उपस्थित माननीय लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन म्हणतात की, "मी राजकारणात आहे, परंतु मी मोरब्बी राजकारणी नाही. त्यामुळे वेळात वेळ काढून अशा प्रकारच्या कार्यक्रमांस मी जात असते. अशा प्रकारच्या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मिळणारे उत्तम विचार, उत्तम संस्कार तसेच संगीतातून मिळणारा स्वर्गीय आनंद यासर्वांचे कण गोळा केल्यावरच मी राजकारणाच्या खोलार्धात शांत राहू शकते. आज या सोहोळ्याद्वारे मंगेशकर भावंडांचं हे प्रेम पाहण्यास मिळालं आणि असं कुटुंब पुन्हा नाही बघायला मिळणारं हे जाणवलं.
मिनाताईंनी एक आठवण म्हणून लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या स्वरांनी संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या या विश्वव्यापी सावलीला तिच्या नव्वदाव्या वर्षातील पदर्पणाबद्दल शुभेच्छा देण्याची ही संधी मी नाकारली असती तर मी करंटी ठरली असते. आणि म्हणूनच मी त्यांना जाऊन भेटून देखील आले. मी मिनाताईंची फार आभारी आहे. 'मोठी तिची सावली' या पुस्तकातून त्यांनी उलगडलेली दिदींची असंख्य रूपं आपल्याला हे शिकवून जाते की, माणूस हा कधीच एका रात्रीत मोठा होत नसतो. एका तेरा वर्षांच्या मुलीने फक्त आपल्या भावंडांनाच आपल्या सवलीत सामावून घेतलं नाही, तर तिने संपुर्ण भारताला स्वतःत सामावून घेऊन जगाला आपलंसं केलं.
लहानपणीच्या आठवणींमध्ये रमत आशा भोसले सांगतात की, "मीनाताईने लिहिलेलं हे पुस्तक अजूनपर्यंत मी वाचलेलं नाहीये, पण एव्हढं मात्र नक्की की दिदींच्या सर्वांत जवळ मी आहे. माई आम्हाला नेहमी म्हणायची 'दिदीची चमची आशा आणि मीनाची चमची उषा.' लहान असताना दीदी नेहमी मला उचलुन घेऊन फिरायची तेव्हा मी फार गुटगुटीत होते. एकदा असंच तिने मला उचलून घेतलेलं असताना काहीतरी कामाच्या नादात शिडीवरून पाय घासारल्यामुळे आम्ही दोघी पडलो. तेव्हा मला थोडंसंच लागलेलं परंतु दीदीला माझ्यापेक्षा खूप अधिक लागलेलं. अगदी रक्तस्राव झालेला.
तेव्हापासून तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आजही मला पायापर्यंत येणाऱ्या दोन जड वेण्या घालून हातात तंबोरा घेऊन सकाळचं सकाळ रियाज करत बसलेली दीदी आठवते, तिच्या सुरात एक प्रकारची अशी काही जादू आहे की तिच्या सुरांमध्ये कितीतरी लोकांचं आयुष्य जन्मोनजन्म विलीन झालं असेल. मी देवाचारणी एकाच प्रार्थना करते की, माझं आयुष्य तिला लाभो!"
"गानसम्राज्ञी लता दीदींना त्यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाबद्दल सर्वांत सुंदर आणि अनमोल भेट जर का कोणी दिली असेल तर ते म्हणजे 'मीनाताई मंगेशकर-खडीकर' यांनी. सत्तर-पंचाहत्तर वर्षे आपल्या मधाळलेल्या स्वरांनी साऱ्या जगावर अनभेशक राज्य गाजवलेल्या दिदींचा स्वर म्हणजे सहस्त्रगाचा स्वर. मिनाताईंनी या पुस्तकातुन उलगडलेलं स्वारमाऊलीच्या सुरुवातीच्या काळातील झगडा मला विशेष आवडला. तो वाचताना कोणत्याही व्यक्तीचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाहीत.