Join us

जितेंद्रने केले या चित्रपटाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 3:19 PM

ती सध्या काय करते या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. या सिनेमाविषयी अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व ...

ती सध्या काय करते या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. या सिनेमाविषयी अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्याचे कौतुक देखील केले. जितेंद्र जोशीने देखील या चित्रपटाविषयी फेसबुकवर लिहीले आहे. जितेंद्र जोशी म्हणतो,  मी मुंबईत आलो होतो काहीतरी बनायला तेव्हा ज्या मित्रांनी मदत केली. सोबत केली, खाऊ पिऊ घातलं त्यापैकी एक सतीश राजवाड़े! त्याच्या सुरुवातीच्या दिवसांत मी त्याचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत असे. आज त्याने दिग्दर्शित केलेला "ती सध्या काय करतेय " हा सिनेमा पाहिला आणि अनेक गोष्टी मनात आल्या. सर्वप्रथम या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिलेल्या आमच्या मैत्रिणीचं मनस्विनीचं अभिनंदन ! तीनं सहज सोपं परंतु चपखल लिखाण केलं आहे. सर्व कलाकारांची कामं उत्तम आणि अभिनिवेष रहित आहेत. तीनंही जोड्या आपापल्या वयोगटानुसार बालिश, भाबडं, निरागस, पोक्त आणि समर्पक काम करताना दिसतात. हृदित्य आणि निर्मोही बालपणात घेऊन जातात, आर्या आणि अभिनय तारुण्याच्या उंबरठयावर मिरवत नेतात. अभिनय बेर्डेने चांगलं काम केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा म्हणून कृपया त्यावर अवास्तव अपेक्षा लादू नका. तो हळूहळू समजून उमजून काम करू लागेल याबद्दल विशवास ठेवा. आर्याकडे असलेली चंचलता आणि तिचं हसू खूप बोलकं आहे.तेजश्री प्रधानने जी 'सल' आपल्या कामातुन दाखवली आहे ते पाहताना दैनंदिन मालिका करूनही अभिनय शाबुत ठेवता येतो हे दाखवलं आहे. माझा मित्र अंकुश चौधरी कित्येक ठिकाणी अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करून मजा आणतो आणि प्रत्येक सिनेमागणिक त्याची मजल वाढत चालली आहे. तो सुंदर आहे हे त्याला कळतंय हे आपल्याला कळतं. विशेष उल्लेख सिनेमाच्या पार्श्वसंगीताचा करावा लागेल. अविनाश विश्वजीत या जोडीने कमाल केली आहे. परंतु मी या सर्व गोष्टींचं श्रेय दिग्दर्शक म्हणून सतीशला देऊ इच्छितो कारण अतिशय सोपा वाटणारा हा सिनेमा त्याने घडवून आणला. आपलं त्या वयातलं प्रेम स्लोमोशन मधेच घडतं आणि ते तसंच दिसलंय आणि ते सतिशच्या नजरेतून दिसतं. हा सिनेमा पाहुन एक फोन नक्की करावासा वाटेल. तो करा अथवा नका करू परंतु सिनेमा आपापल्या 'त्या' माणसाची आठवण करून देईल ती मात्र जपा!सतीश राजवाडेच्या आजवरच्या सिनेमातला सर्वोत्कृष्ट सिनेमा.