चित्रपट हे सशक्त आणि वेगळं माध्यम आहेः कल्पना विलास कोठारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 12:11 PM
वेगळ्या जातकुळीच्या विषयाला हात घालून त्या विषयावर चित्रपट निर्मितीच शिवधनुष्य उचलणं हे मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी सध्या खूप मोठ्ठं आव्हान ...
वेगळ्या जातकुळीच्या विषयाला हात घालून त्या विषयावर चित्रपट निर्मितीच शिवधनुष्य उचलणं हे मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी सध्या खूप मोठ्ठं आव्हान आहे. त्यातही 'दशक्रिया' सारखा अत्यंत संवेदनशील विषय म्हणजे निर्मात्याची एक प्रकारे परीक्षाच म्हणता येईल, पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन 'दशक्रिया' चित्रपट निर्मितीचं आव्हान स्वीकारून निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांनी पदार्पणातच बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये विविध गौरव आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावून मराठीचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकवत ठेवला आहे. त्यांच्या 'रंगनील क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेचा 'दशक्रिया' हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद... सहसा आशयघन चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते तयार होत नाहीत. तुम्ही दशक्रियासारख्या आशयघन विषयावर चित्रपट निर्मितीसाठी कशा तयार झालात?काही वर्षांपूर्वी मी प्रेमानंद गज्वी यांच्या किरवंत या नाटकात काम केलं होतं. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत बरीच पारितोषिकं मिळाली होती. तेव्हाच हा विषय आवडला होता. व्यावसायिक रंगभूमीवर काही चांगल्या नाटकांची निर्मिती केली होती. त्या दरम्यानच लेखक संजय कृष्णाजी पाटील आणि दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी दशक्रिया या चित्रपटाचा प्रस्ताव मांडला. संहिता वाचल्यावर विषय आवडला. लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी चित्रपटाचं लेखन उत्तम केलं होतं. दशक्रिया ही बाबा भांड यांची राज्य पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. चित्रपटासाठी केवळ चांगला विषय असून भागत नाही, तर चित्रपट किती चांगला बनतो, हेही महत्त्वाचं असतं. संदीप पाटील यांचा आत्मविश्वास पाहून हा चित्रपट करायचं ठरवलं. संदीप पाटील यांच्यासारख्या नव्या दिग्दर्शकाकडे चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवताना दडपण नाही आलं?संदीप पाटील यांनी या पूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनेक चांगल्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांचा या माध्यमाचा अनुभव दांडगा आहे. या विषयाला ते योग्य न्याय देतील अशी चमक त्यांच्यात दिसत होती. त्यांनी या विषयाचा केलेला सखोल विचारच साक्ष देत होता. शिवाय संहिता उत्कृष्ट होती. त्यामुळे तसं काही दडपण नव्हतं. तुम्ही या चित्रपटात छोटी भूमिकाही केली आहे. त्याविषयी काय सांगाल? चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?आधी म्हटल्याप्रमाणे, मी नाटकाशी पूर्वीपासून संबंधित होते. नाटकांतून अभिनयही केला होता. मात्र, नाटक वेगळं आणि चित्रपट वेगळा. या चित्रपटात माझी भूमिका अगदीच छोटी आहे. मात्र, मला काम करायला खरंच खूप मजा आली. चित्रपट हे किती सशक्त आणि वेगळं माध्यम आहे हे अनुभवता आलं. पदार्पणातच 'दशक्रिया'ला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एवढं यश मिळेल याची अपेक्षा होती?खरं सांगायचं, तर खरंच एवढी अपेक्षा नव्हती केली. आम्हाला फक्त चांगला चित्रपट करायचा होता. त्याला तीन राष्ट्रीय चित्रपटांसह एकूण २८ पुरस्कार मिळाले आहेत. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बाबा भांडं यांची मूळ कादंबरी आणि संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेली संहिता भक्कम होती त्यामुळे एक उत्तम आणि दर्जेदार चित्रपट तयार होईल, हा विश्वास होता. Also Read : एनफडीसीच्या फिल्म बाजार मध्ये 'दशक्रिया'ची निवड!