मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. काही मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोलाची कामगिरी केलीय हेही सगळ्यांना ठाऊक आहे. काही मराठी चित्रपटांचे प्रीमियरही परदेशात झाले आहेत. मात्र, दिग्दर्शक प्रकाश जाधव यांच्या "वेल डन बॉईज" या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी वेगळीच झेप घेतली आहे. परदेशातील उद्योजक 'फेड्री रिगन' यांच्या 'वर्ल्ड ग्लोब'संस्थेअंतर्गत या चित्रपटाचा भव्य प्रीमियर चार मोठ्या देशांमध्ये होणार आहे. लंडन,कॅनडा,सिंगापूर व दुबई येथे या चित्रपटाचा प्रीमियर करण्याचे निश्चित झाले आहे.
लहान मुलांच्या जीवनावर 'वेल डन बॉईज' या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रकाश जाधव यांचे याअगोदरचे सिनेमे देखील लहान मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे होते. साईनाथ चित्र निर्मित 'वेलडन बॉईज' या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत.गीतलेखन आशिष निनगुरकर व अशोक मानकर यांनी केले असून चित्रपटाचे छायांकन त्रिलोकी चौधरी,हितेश बेलडर व प्रकाश कारलेकर यांचे असून संकलन- दिग्दर्शन प्रकाश आत्माराम जाधव यांचे आहे. या चित्रपटात मोहन जोशी,विजय पाटकर,शिल्पा प्रभूलकर,प्रिय रंजन,विनोद जॉली,महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकारांनी यात भूमिका साकारली आहे.या चित्रपटाची संकल्पना ऐकूनच उद्योजक फेड्री रिगन यांनी या चित्रपटाचा प्रीमियर करण्याचे ठरवले.येत्या नोव्हेंबर मध्ये परदेशात या मराठी चित्रपटाचा प्रीमियर होतोय याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश जाधव म्हणाले, भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही तर परदेशात अनेक ठिकाणी मराठी माणसे आहेत.कामानिमित्त किंवा उद्योगधंद्यानिमित्त मराठी लोक तेथे स्थायिक झाले आहेत.त्यामुळे अनेक देशांतून मराठी चित्रपटांना मागणी वाढत आहे,त्यात आमच्या चित्रपटाचा विषय सामाजिक व लहान मुलांच्या केंद्रभागी फिरत असल्याने तो रसिकांना वस्तुंस्थितीचे भान देईल.चार देशांची नावे निश्चित झाली आहेत. 'वेल डन बॉईज' चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे." "वेल डन बॉईज" हा चित्रपट महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार आहे.