वय म्हणजे निव्वळ आकडा हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीकडे पाहिलं की जाणवतं. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मृणालचा फिटनेस आणि तिचं सौंदर्य अबाधित आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. मराठीसह हिंदी मालिका विश्वातही मृणालने तिची छाप उमटवली. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या मृणालला कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळाला होता. परंतु, असं असूनही तिला मात्र या क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं. आज ती तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे त्यामुळे तिची इंडस्ट्रीत नेमकी एन्ट्री कशी झाली ते जाणून घेऊयात.
मृणालची अवंतिका आणि सोनपरी या दोन मराठी-हिंदी मालिका तुफान गाजल्या. आजही प्रेक्षक त्यांना या दोन मालिकांमुळेच ओळखतात. आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या. परंतु, जीवनात त्यांचा कल कधीच अभिनयाकडे नव्हता. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्या एका ठिकाणी नोकरी करत होत्या.
गो. नी.दांडेकर यांची नात असलेल्या मृणालचे आई-वडील शिक्षण क्षेत्रात होते. त्यांचे वडील पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर, आई शाहू महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवायची. त्यामुळे आपण सुद्धा आई-वडिलांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात करिअर करावं असं मृणाल यांची इच्छा होती. त्यामुळे सुरुवातीला त्या शाहू महाविद्यालयात लेक्चरर म्हणून पार्ट टाइम जॉब करत होत्या. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्यदेखील केलं होतं.
मृणाल यांना पहिल्यांदा स्वामी या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेत त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्नीची रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना एकावर एक मालिका, सिनेमांच्या ऑफर्स मिळत गेल्या आणि त्यांचा इंडस्ट्रीतला प्रवास सुरु झाला.
दरम्यान, मृणाल यांनी सोनपरी, अवंतिका, श्रीकांत, द ग्रेट मराठा, द्रौपदी, हसरतें, मिराबाई, स्पर्श यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्यांनी मराठीसह बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं. आशिक, कुछ मिठा हो जाये, मेड इन चायना, आग या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. इतकंच नाही तर अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. रमा माधव हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.