मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लाडकी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयाबरोबरच मृण्मयीच्या सौंदर्याचीही चर्चा होताना दिसते. अनेक मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृण्मयीने तिच्या अभिनयाची छाप पाडली. मृण्मयीचा आज वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मृण्मयीला शुभेच्छा दिल्या आहेत.
मृण्मयीने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात तिचं स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. अग्निहोत्र या गाजलेल्या मालिकेने मृण्मयीला ओळख मिळवून दिली. या मालिकेतून मृण्मयीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'कुंकू' या मालिकेत ती दिसली होती. अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्येही मृण्मयीने काम केलं आहे. 'मोकळा श्वास', 'भाई : व्यक्ती की वल्ली', 'आंधळी कोशिंबीर', 'साटं लोटं पण सगळं खोटं', 'संशय कल्लोळ', 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट' अशा सिनेमांमध्ये ती दिसली. 'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'सुभेदार' या सिनेमांमध्ये मृण्मयीने ऐतिहासिक भूमिका साकारल्या. आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेल्या मृण्मयीने बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे.
कॉलेजमध्ये असतानाच मृण्मयीला अभिनयाचे वेध लागले होते. शॉर्ट फिल्मच्या ऑडिशनसाठी गेलेल्या मृण्मयीच्या हाती थेट बॉलिवूड सिनेमा लागला होता. त्यावेळी मृण्मयीने अनेक नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मृण्मयीची कॉलेजमधील मैत्रीण शॉर्ट फिल्ममध्ये काम करत होती. शॉर्ट फिल्मच्या साहाय्यक दिग्दर्शकाने मृण्मयीला पाहिल्यानंतर तिला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. त्यानंतर तिची वर्णी थेट बॉलिवूड सिनेमात लागली. या सिनेमातूनच तिला पहिला ब्रेक मिळाला होता. हा सिनेमा म्हणजे २००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'हमने जिना सिख लिया'. या सिनेमात मृ्ण्मयीने मुख्य भूमिका साकारली होती. मृण्मयीबरोबर सिद्धार्थ चांदेकरही मुख्य भूमिकेत होता. प्रिया मराठे, मिलिंद गुणाजी, प्रतिक शेलार, ऋजुता शिंदे हे कलाकारही या सिनेमात होते.