Join us

सेम टू सेम! मृण्मयी आणि गौतमीच्या नवऱ्यामधील फरक ओळखता येतोय का? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 10:48 AM

देशपांड्यांचे जावई! मृण्मयी देशपांडेने शेअर केलेला फोटो चर्चेत

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी बहिणी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीनेही मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. नुकतंच गौतमी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गौतमीने स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांदऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, आता मात्र एका वेगळ्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देशपांड्यांच्या जावयांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मृण्मयीचा पती स्वप्निल आणि गौतमीचा नवरा स्वानंद दिसत आहेत. स्वप्निल आणि स्वानंदच्या साइड फेसचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये त्यांची हेअरस्टाइल आणि दाढीची स्टाइलही सेम असल्याचं दिसत आहे. स्वानंद आणि स्वप्निलचा हा फोटो पाहून एका क्षणासाठी ते दोघेही जुळे भाऊ असल्यासारखं भासत आहे. हा फोटो शेअर करत मृण्मयीने "फोटो मधले ८ फरक ओळखा आणि १००० रुपये मिळवा…", असं कॅप्शन दिलं आहे. 

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहतीने कमेंट करत दोघांमधले ८ फरक ओळखून दाखवले आहेत. "साडू साडू मिळून खाऊ लाडू... फरकचं ओळखायचा खेळ म्हणून बघितलं तर एक मृण्मयीचे अहो आणि दुसरे गौतमीचे. 2 नाव वेगळी 3. कुर्ता स्टाईल वेगळी. 4 हेअर स्टाईल वेगळी 5 एक अनुभवी आणि दुसरे लग्नाचा अनुभव घ्यायला सज्ज 6 एक शेतीप्रिय तर दुसरे प्रसारक 7 तीळ 8 दाढी स्टाईल वेगळी. 😂😂😂 तुम्ही पूर्ण फॅमिली छान बोलता, मनोरंजन करता.", अशी कमेंट चाहतीने केली आहे. या कमेंटवर मृण्मयीने उत्तर देत "best आता १००० रुपये धाकट्या बहिणीकडून घ्या", असं म्हटलं आहे. 

दरम्यान, मृण्मयीने २०१६ साली स्वप्निल राव याच्याशी लग्न करत संसार थाटला. अनेकदा ती नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. मृण्मयी आणि गौतमी यांचं नातंही फारच खास आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्या एकमेकींबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेगौतमी देशपांडेसेलिब्रिटी