कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमधून मृण्मयीमध्ये दडलेली कला जगासमोर आलीय. यांत मृण्मयी भारतीय शास्त्रीय नृत्याचा रियाज करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “अचानक मैफिल जमली आणि खूप वर्षांनी , रियाझ चालू नसताना सुद्धा, तत्कार करण्याचा प्रयत्न केला” असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.
संगीताच्या तालावरील तिचं पदलालित्य पाहून तिचे फॅन्सही फिदा झालेत. या व्हिडिओवर मृण्मयीच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. मृण्मयीने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. विशेष म्हणजे तिची 'फर्जद' सिनेमातील भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने 'केसर' नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.
मृण्मयीने त्यासाठी १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला होता. याशिवाय 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट', 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.