Join us

मुकेश ऋषींना 'शेर शिवराज'मध्ये अफजल खानाची भूमिका साकारताना आले होते 'हे' टेन्शन, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 7:14 PM

Sher Shivraj Movie: ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शेर शिवराज या चित्रपटात दिग्पाल लांजेकर यांनी बहिर्जी नाईकांचे पात्र साकारले आहे. त्यांच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तर चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात अफजल खानाची भूमिका कोण साकारत आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक होते. शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातून अखेर अफजल खानाच्या भूमिकेचा उलगडा झाला आहे. ही भूमिका बॉलिवूड अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी साकारली आहे. 

मुकेश ऋषी यांनी अफजल खानाच्या भूमिकेबद्दल सांगितले की, दिग्पाल लांजेकर यांनी मला अफजल खानाच्या भूमिकेबाबत विचारले त्यावेळी मी ही भूमिका साकारण्यास खूपच उत्सुक होतो. ते अतिशय अभ्यासू आणि मेहनती दिग्दर्शक आहेत. या भूमिकेबाबत त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो प्रेक्षकांच्यासमोर कशा प्रकारे साकारायचा याची त्यांना जाणीव आहे. याअगोदर मला इंग्रजी चित्रपटात याच भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. मात्र त्याबाबत पुढे काहीच बोलणे झाले नाही. 

ते पुढे म्हणाले की, अफजल खान म्हटल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो दाढीवाला धिप्पाड शरीरयष्टी असलेला खलनायक. मी बहुतेक चित्रपटात दाढी वापरलेली नाही त्याला आता खूप वर्षे लोटली होती परंतु या भूमिकेसाठी मला दाढी दाखवण्यात आली त्यावेळी ती दाढी पाहून मी खूप टेन्शनमध्ये होतो कारण दाढी असली की तुम्ही कम्फर्टेबल नसता मात्र या भूमिकेसाठी तसा गेटअप करावा लागणार याची मला कल्पना होती. कारण ही दाढीच या भूमिकेची खरी ओळख होती. 

चित्रपटासाठी मला एक महिनाअगोदरच स्क्रिप्ट देण्यात आली होती. हे डायलॉग म्हणत असतानाच मला या भूमिकेची ताकद समजली होती. मी उत्तर भारतीय असल्याने मला उर्दू भाषेची चांगली जाण आहे आणि ही भाषा मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. चित्रपटातला माझा लूक खूप क्रूर दाखवण्यात आला आहे मी जेवढा क्रूर दिसेल तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उठावदार होईल हे मला माहित होते. त्यामुळे मला माझ्या भूमिकेबाबत कुठलीच सहानुभूती नको होती. अफजलखानच्या भूमिकेमुळे प्रेक्षक माझा तिरस्कार करणार याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु आजकाल सर्वांनाच या अभिनय क्षेत्राबाबत आणि पडद्यामागच्या गोष्टींबाबत माहीत झाले आहे . माझ्या सोसायटीतली लहान मुलं माझ्यासोबत खेळतात. त्यामुळे त्यांना माहीत झाले आहे की मी चित्रपटात काम करतो आहे. माझ्या भूमिका खलनायकी ढंगाच्या आहेत. तुम्हाला या भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवायच्या असतील तर तुम्हाला त्या तितक्याच ताकदीने उभ्या कराव्या लागतात. या चित्रपटाचे पोस्टर मी माझ्या घरात लावणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकर