Join us

मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेला 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:56 IST

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला. मायरा वायकुळच्या अभिनयाने वेधलं लक्ष (myra vaikul)

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मायरा वायकुळ. मायरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील 'सुंंदर परिवानी' हे गाणं काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा बहुचर्चित टीझर भेटीला आलाय. मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने हा टीझर सजला आहे.

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाच्या टीझरमध्ये एका गावात मायरा शिकलेली दिसते. तिला देवाच्या घराबद्दल उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्येकाला ती देवाचं घर म्हणजे काय? असं विचारताना दिसते. इतकंच नव्हे तर ती तिच्या आजीला तू देवाघरी कधी जाणार असं विचारताच आजीला मोठा धक्का बसतो. शेवटी मायरा देवाला पत्र लिहिताना दिसते. मायराला देवाच्या घराबद्दल इतके प्रश्न का असतात? तिला नक्की कशाचा शोध असतो? असे प्रश्न 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर निर्माण करतो.

कधी रिलीज होणार सिनेमा?

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात मायरा वायकुळ मध्यवर्ती भूमिकेत दिसत असून तिच्यासोबत अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत,सविता मालपेकर, प्रथमेश परब,  सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेल्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :मायरा वैकुलमराठी चित्रपट