प्रेक्षकांचा सर्वात आवडता मराठी चित्रपट म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई' (Mumbai Pune Mumbai). सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाते आतापर्यंत तीन भाग आलेत. तर आता चौथा भाग कधी येणार अशी प्रेक्षक सतत विचारणा करत असतात. या सिनेमातून स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही जोडी प्रेक्षकांच्या अत्यंत लाडकी बनली. त्यांचा 'नाच गं घुमा' सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. यात मुक्ता काम केलंय तर स्वप्नील निर्माता आहे. प्रमोशनदरम्यान मुक्ताला 'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार हा प्रश्न विचारला तेव्हा ती काय म्हणाली वाचा.
'मुंबई पुणे मुंबई'च्या पहिल्या भागात आपली गौरी आणि गौतम या दोघांशी ओळख झाली. काही वर्षांनी आलेल्या दुसऱ्या भागात या दोघांचं लग्न झालं. तर तिसऱ्या भागात ते आईबाबा झाले. आता चौथा भाग कधी येणार आणि त्यात काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता म्हणाली,"आम्ही तिघंही म्हणजे मी, स्वप्नील आणि सतीश एकमेकांचीच वाट पाहत आहोत. सगळे काय आता कधी येणार असंच विचारतात. मग हो, लवकरच असं आम्ही एकमेकांना म्हणतो. प्रेक्षकांना चौथा भाग हवा आहे आणि आम्हालाही करायचाच आहे. कारण हा असा सिनेमा आहे ज्याच्यासोबत लोक जगत आहेत. त्यात जे घडतंय ते अगदी खरं असल्यासारखंच लोकांना वाटतं. म्हणजे गौतम आणि गौरी यांचं वेगळं आयुष्य सुरुच आहे अशी लोकांची भावना असते."
ती पुढे म्हणाली, "जेव्हा जेव्हा मला प्रेक्षक भेटतात तेव्हा मुंबई पुणे मुंबई बद्दल हेच सांगतात की आम्हीही असेच भेटलो होतो, असेच प्रेमात पडलो होतो. आता पुढे काय होणार आहे सिनेमात असं विचारतात. तेव्हा मी म्हणते जे तुमचं खऱ्या आयुष्यात होणार तेच...खरंच प्रेक्षकांचं सिनेमाशी फारच गंमतीशीर आणि घट्ट नातं जुळलं आहे. सतीशला मी सांगते की लवकर मनावर घे आता."