Join us

मुक्ता बर्वेला 'हृदयांतर' या चित्रपटासाठी घ्यावी लागली प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 8:44 AM

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे ही जोडी २००९ साली 'एक डाव धोबी पछाड' या चित्रपटात दिसली होती. यानंतर तब्बल ...

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे ही जोडी २००९ साली 'एक डाव धोबी पछाड' या चित्रपटात दिसली होती. यानंतर तब्बल ८ वर्षांनी सुबोध आणि मुक्ता 'हृदयांतर' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. लोकमत ऑफिसला दिलेल्या भेटीदरम्यान मुक्ताने चित्रपटातील प्रवासाविषयी दिलखुलास गप्पा रंगल्या. 'हृदयांतर' या चित्रपटात मुक्ता एका आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याविषयी सांगताना मुक्ता सांगते, "आईची भूमिका करणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. कारण आई होण्याचे नाटक करून चालत नाही, तर ते आईपण तुमच्या आतून यावे लागते. याआधीच्या 'कबड्डी कबड्डी' या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि आता 'हृदयांतर'मधील भूमिकेसाठी मला विशेष कष्ट घ्यावे लागले. फॅशन इंडस्ट्रीतील ख्यातनाम डिझायनर विक्रम फडणीस हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शनाचा अनुभव नसतानाही त्यांनी वाचून दाखवलेली चित्रपटाची कथा जशीच्या तशी पडद्यावर पाहायला मिळतेय, ही एक कौतुकास्पद बाब आहे."  या चित्रपटाची खास बाब म्हणजे हृतिक रोशन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तो खूप विनयशील अभिनेता आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव फार छान होता, असे मुक्ताने सांगितले. मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीविषयी ती सांगते, "मराठी चित्रपट आशयघन असतात. आता या माध्यमाकडे व्यवसाय म्हणून पाहणारी एक वेगळी पिढी तयार झाली आहे. यामुळेच अमराठी निर्माते मराठी चित्रपटांकडे वळताना दिसतात, ही आनंदाची गोष्ट आहे." या मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या कथानकाविषयीही तिने खुलासा केला. तिने सांगितले की, 'हृदयांतर' या चित्रपटात पात्रांचा मानसिक प्रवास पाहायला मिळणार आहे. या प्रवासात प्रत्येकाचे अंतरंग, आयुष्यात उठणारी वादळे आणि त्या वादळातून तरलेली माणसे जवळून अनुभवायला मिळणार आहेत.गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.