मौलाना आझाद यांच्यावरील पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट राजेंद्र फिल्म्सच्या अधिपत्याखाली प्रदर्शित होत असून प्रस्तुती श्रीमती भारती व्यास यांची आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते डॉ राजेंद्र संजय यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ राजेंद्र संजय आणि संजय सिंग नेगी यांचे आहे. चित्रपटाचे संगीत दर्शन कहर यांचे असून मनोज मिश्रा यांनी कला दिग्दर्शन केले आहे. प्रमुख भूमिकांमध्ये लीनेश फणसे (मौलाना आझाद), सिराली (झुलेखा बेगम), सुधीर जोगळेकर, आरती गुप्ते, डॉ राजेंद्र संजय, अरविंद वेकारीया, शरद शहा, केटी मेंघानी, चेतन ठक्कर, सुनील बळवंत, माही सिंग, चांद अन्सारी आणि वीरेंद्र मिश्रा हे कलाकार चमकणार आहेत.
मौलाना आझाद ज्यांचे पूर्ण नाव अब्दुल कलाम मोहीद्दीन अहमद होते,त्यांचे बालपण हे कलकत्ता (कोलकाता) येथे गेले. त्यांचे मोठे बंधू यासीन आणि तीन मोठ्या बहिणी झैनाब, फातिमा आणि हनिफा यांच्याबरोबर ते राहत असत. त्यांना साहित्यामध्ये रुची होती आणि ‘नारंग-ए-आलम’ हे हस्तलिखित ते प्रकाशित केले होते. त्याला साहित्यिक विश्वात खूप मान्यता मिळाली होती. देशभक्त म्हणून त्यांनी श्री अरबिंदो घोष यांच्या क्रांतिकारी संघटनेचे सक्रीय सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर पत्रकार म्हणून त्यांनी ‘अल हिलाल’ आणि ‘अल बलाह’ ही दोन मासिके चालविली आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ती एवढी लोकप्रिय झाली की भीतीपोटी ब्रिटीश सरकारने ती दोन्ही प्रकाशाने बंद केली आणि मौलाना आझाद यांना कलकत्ता येथून हद्दपार केले. त्यांना रांची येथे नजरबंद करून ठेवण्यात आले.
त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९२० मध्ये त्यांना सोडून देण्यात आले. ते महात्मा गांधी यांना दिल्ली येथे प्रथमच भेटले आणि अगदी अल्पावधीतच त्यांचे विश्वासू सहकारी बनले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लढताना त्यांना अनेकदा तुरुंगवास सहन करावा लागला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाने जवाहरलाल नेहरू खूपच प्रभावित झाले होते आणि त्यांनी आझाद यांना मोठ्या भावासारखे वागवायला सुरुवात केली होती. १९२३मध्ये वयाच्या ३५व्या वर्षी ते सर्वात युवा कॉंग्रेस अध्यक्ष झाले. श्री गांधी यांना मोठा तुरुंगवास झाला असताना, कॉंग्रेसची दोन दोन शक्कले उडाली, पण मौलाना आझाद यांनी त्या दोन गटांना एकत्र करून पक्ष पुन्हा एकसंध बनविला. स्वतंत्र भारताचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय दाखल केले आणि भारताची शिक्षणपद्धती पाश्चिमात्य देशांच्या बरोबर नेली. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदू-मुस्लिमांच्या एकजुटीसाठी वेचले. ते कसे याची उत्तरे हवी असतील तर चंदेरी पडद्यावर पाहा. १८ जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होत आहे.