मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुलगी झाली फेम विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण माने (Kiran Mane) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढल्याचा दावा किरण माने यांनी केला होता. मात्र, त्यांच्या वर्तनामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची स्पष्टीकरण वाहिनीकडून देण्यात आले. मात्र, यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर किरण माने यांना एका मोठ्या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. याबाबत किरण माने यांनी पोस्ट लिहून माहिती दिली आहे.
मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता किरण माने नवीन काय करणार याकडे टीव्ही जगताचे लक्ष लागले होते. आता स्वतः किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. किरण माने यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ‘आनंद वो...निव्वळ आनंद...’ म्हणत त्यांनी आपण नवा चित्रपट करत असल्याची घोषणा केली आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात किरण माने यांची वर्णी लागली आहे. या चित्रपटात किरण माने कोणती व्यक्तिरेखा साकारणार, हे समजू शकलेले नाही.
काय म्हणतात किरण माने आपल्या पोस्टमध्ये?
“आनंद वो... निव्वळ आनंद... नवीन भन्नाट जबराट नादखुळा भूमिका! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपन वास्तवात ज्या विचारधारेची 'भूमिका' घेत असतो...लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी 'भूमिका' मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!!
शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने..., अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आणि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेभळेकर, ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके.. टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात. कुणी काहीही म्हणू दे. असं बोलून मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल... आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला 'माणूस' असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे... प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार... प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?
...एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पॉटबॉय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला... चेहर्यावर संताप दिसत होता.. सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं. त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय.. तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का?? मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची..
बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्या बाजूला अशा व्यक्तीची भूमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं... प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू.. या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक... धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!!”