अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रोडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला 'मुळशी पॅटर्न' चित्रपट दिवाळी नंतर येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात असणाऱ्या कलाकारांविषयी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळवलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीज दाते, देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार अभिनयात सरस असून त्यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका, त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
'मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला हा योगायोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:18 PM