Join us

'मुळशी पॅटर्न' चित्रपट 'ह्या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:24 PM

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्दे 'मुळशी पॅटर्न' चित्रपट २३ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रोडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला 'मुळशी पॅटर्न' चित्रपट दिवाळी नंतर येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण या सिनेमातील 'अराररा खतरनाक' हे गाणे सुपरहिट झाले आहे. अत्यंत वेगाने व्हायरल झालेल्या आयटम साँगच्याच धर्तीवर बनलेल्या या गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अल्पावधीत तब्बल पंधरा लाखाहून अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर आता अतिशय हटके अंदाजातील मोशन पोस्टरमुळे सिनेमाबाबत तरुणाईची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

'मुळशी पॅटर्न'मधून लेखक, दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडले आहे.करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने 'कुंकू' ह्या मालिकेसाठी त्याने तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले आणि ही मालिका सुपरहिट ठरली.  पुढे 'पिंजरा', 'अनुपमा', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'मेंदीच्या पानावर', 'तुझं माझं जमेना', 'असं हे कन्यादान' अशा अनेक यशस्वी मालिका प्रवीणने लिहिल्या आहेत. अनेक चित्रपटातून त्याने छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. 'चिनू' , 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'तुकाराम', 'मसाला', 'रेगे', 'कोकणस्थ' ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.

मालिकेनंतर चित्रपटाच्या लेखनाचे आणि दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्याने उचलले. 'देऊळबंद' ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयाने त्याने मराठी चित्रपटसृष्टीला 'देऊळबंद'सारखा सुपरहिट चित्रपट दिला. 'देऊळबंद'च्या व्यतिरिक्त इतरही अनेक प्रसिद्ध चित्रपटाचे लेखण प्रवीणने केले आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडे