मराठी कलाविश्वातील एक काळ दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अलका कुबल, वर्षा उसगांवकर या कलाकारांनी गाजवला. या कलाकारांचे सिनेमे प्रेक्षक अगदी डोक्यावर घेत असत. अलका कुबल (Alka Kubal) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान नुकतेच एका मुलाखतीत अलका कुबल यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतचा किस्सा शेअर केला आहे.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेकारकीर्द, सहकलाकार, खासगी आयुष्य यावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींनाही उजाळा दिला.
त्या म्हणाल्या की, लक्ष्मीकांत बेर्डे आमच्यासाठी डब्बे घेऊन यायचा. त्यावेळी रूहीने त्याला डब्बे करून देणे. खूप मजा यायची. तेव्हा एक वेगळंच वातावरण असायचं. आपलेपणाने काही झालं तरी लक्ष्याचं बघायला येणं. तसेच प्रिया पण एकदा तिला कळलं की माझं डोकं दुखतंय. चार दिवस काहीतरी झालं होतं. मी झूम्बा लावला होता आणि मला त्रास झाला होता. लगेच प्रिया आणि लक्ष्या असे सगळ्यांचे फोन आले होते.
अलका कुबल पुढे म्हणाल्या की, माझी गाडी रस्त्यात बंद पडली होती. त्यावेळी मुंबई बंद झाली होती. लक्ष्याचा ड्रायव्हर फ्रान्सिसने ते पाहिलं. त्यावेळी त्याने लक्ष्याला सांगितलं, साहेब, मॅडम की गाडी रास्ते में खडी है. त्यावेळी मोबाईल नव्हते. घरी जाऊन लक्ष्याने लॅण्डलाइनवर फोन केला आणि विचारले की, अलकाचा काय प्रॉब्लेम झाला. त्यावेळी मी घरी पोचले होते. गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आणि मी गाडी तिथेच तशीच सोडून आले होते. तो आपुलकीने खूप चौकशी करायचा.