चित्रपटांचे माहेरघर असलेल्या मुंबई शहराचा जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. चित्रपट निर्मितीत हे शहर अग्रगण्य असून सर्वात मोठी चित्रपटनगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. याची दखल आता संयुक्त राष्ट्रसंघाने (युनेस्को) घेतली आहे. येथील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार मुंबई शहराला "युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म" ही ख्याती प्राप्त झाली आहे. या लोगोचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी व्यवसाय विकास खात्याच्या प्रमुख शशी बाला उपस्थित होत्या. युनेस्को अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये तसेच परिसंवादांमध्ये मुंबई शहराचा सक्रिय सहभाग असतो.
या सर्व उपक्रमाकरिता मुंबई महापालिका राज्य शासनाच्या चित्रनगरी, प्रोडूसर गिल्ड ऑफ इंडिया, चित्रपट जगतामधील दिग्गज मंडळी, संबंधित महामंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यासोबत समन्वय साधत असतात. दरम्यान, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीचे ज्ञान मिळावे, तसेच या संबंधित उद्योगांबाबत माहिती प्राप्त व्हावी याकरिता मराठी चित्रपट महामंडळ आणि व्हिसलिंग वुड्स यांच्या सहकार्याने माहितीपट व परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळात इतर सृजनशील शहरांसोबत सामंजस्य करार करण्याचे विचाराधीन आहे.