Join us

‘संगीत माझा श्वास’-सावनी रविंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 12:32 PM

अबोली कुलकर्णीगायिका सावनी रविंद्र हिने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक अविट गोडीची गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, मराठी गाणी, ...

अबोली कुलकर्णीगायिका सावनी रविंद्र हिने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक अविट गोडीची गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, मराठी गाणी, मालिकांमधील गाण्यांमुळे ती आज घराघरांत पोहोचली आहे. तिचे ‘कोट्टली’ या तमीळ सिनेमातील पहिले गाणे अलिकडेच रिलीज झाले आहे. याविषयी आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...* ‘कोट्टली’ या सिनेमातलं तुझं पहिलं तमिळ गाणं अलिकडेच रिलीज झालंय. काय तयारी करावी लागली आणि किती अवघड होतं या गाण्याची तयारी करणं?-  गेल्या दोन वर्षांपासून मी तमीळ  इंडस्ट्रीसाठी गात आहे. त्यातील रिलीज झालेलं हे पहिलं गाणं आहे. याआधी जी गायली आहेत ती युट्यूब सिंगल्स होती. या सिंगल्सचा चित्रपटासोबत काहीही संबंध नसतो. मात्र, तमीळ ही भाषा खूपच कठीण आहे. ही भाषा मला केवळ समजते, बोलता येत नाही. कर्नाटक आधारित हे संगीत असल्याने तितकंच आव्हान देणारं होतं. मराठी गाणं रेकॉर्ड करायला जर मला दोन तास लागत असतील तर तमीळ गाणं रेकॉर्ड करायला मला तीन ते चार तास नक्कीच लागतात. पण, होय, ही सर्व गाणी रेकॉर्ड करण्यापासूनची प्रक्रिया खूपच उत्साहवर्धक होती. * तुझ्या सांगितीक वाटचालीची सुरूवात तुझे वडील डॉ.रविंद्र घांगुर्डे आणि आई डॉ. वंदना घांगुर्डे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे झाली. मात्र, पुढे तुझा प्रवास कसा सुरू झाला?- होय, माझे आई-वडील हे संगीत जाणकार असल्यामुळे आमच्या घरी शास्त्रीय संगीत, भावगीत या प्रकारात गाणाºया दिग्गजांचं येणं-जाणं कायम असायचं. त्यातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी. त्यांच्याकडे बघून, ऐकून मी तयार झाले. मी वयाच्या १४व्या वर्षापासून त्यांच्यासोबत गाणी गावू लागले. मी हृदयनाथजी यांच्यासोबत प्रोफेशनली गाऊ लागले आणि २०११ मधील ‘झी सारेगमप’ मध्ये सहभागी झाले. आणि मी त्या सीजनची फायनलिस्ट ठरले होते.* ‘होणार सून मी या घरची’ या झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील गाण्यांमुळे तू घराघरांत पोहोचलीस. त्यावेळी कशा प्रतिक्रिया तुला मिळाल्या?- खरंच खूप आनंद देणाºया प्रतिक्रिया मला मिळाल्या. या मालिकेतील सर्व गाणी मी आणि मंगेश बोरगावकर याने गायली आहेत. असं म्हणतात ना की, चित्रपटात गाण्यापेक्षा छोटया पडद्यावरील मालिकांमध्ये गावं. तसंच माझंही झालं. माझं गाणं जास्तीत जास्त रसिकप्रेक्षकांपर्यंत गेलं. अनेक ठिकाणी मी कार्यक्रमांसाठी जाते. त्यावेळी प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी मला याच मालिकेतील गाण्यांची फर्माईश येते. एका कार्यक्रमाच्या शेवटी एक ताई माझ्याकडे आल्या. त्या म्हणाल्या,‘तुमचं मालिकेतील गाणं ऐकल्याशिवाय माझा मुलगा जेवणच करत नाही. याला जेवू घालायचे असेल तर आम्हाला तुमचं हे गाणं प्ले करावं लागतं.’ असे अनेक किस्से जेव्हा समोर येतात तेव्हा नक्कीच आपण केलेल्या गायनाचे समाधान वाटते.* ‘आशाएँ’,‘अजूनही’ अशा अनेक म्युझिक अल्बमसाठी तू आवाज दिला आहेस. तसेच सुरेश वाडकर, रविंद्र जैन, अरूण दाते, रविंद्र साठे या सारख्या अनेक दिग्गज मंडळींसोबत तू स्टेज शोज, कार्यक्रम केले आहेत. कसा होता अनुभव आणि काय शिकायला मिळालं?- होय नक्कीच. खूप काही शिकायला मिळालं. कारण जिथे यासारख्या दिग्गज मंडळींना केवळ पाहणं देखील कठीण असतं, तिथं मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं, हा खरंतर माझ्यासाठी ठेवा आहे. रियाझ कसा करावा? गायनाचे विविध प्रकार? अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी मला त्यांच्या सहवासातून शिकायला मिळाल्या. * यावर्षात तुझ्या कुठल्या मराठी चित्रपटातील गाणी आम्हाला ऐकायला मिळतील?- गेल्या वर्षी ‘काय रे रास्कला’ या चित्रपटातील ‘मोनालिसा’ हे आयटम नंबर रसिकांच्या भेटीला आले होते. तसेच यावर्षात डॉ. रखुमाबाई, दोस्तिगिरी यासारख्या अनेक मराठी चित्रपटांसाठी मी गाणी गायली आहेत. याशिवाय माझ्या ‘इमइ’ या तमीळ चित्रपटातील गाणं गेल्या आठवडयात रिलीज झालंय. हे मी प्रथमच ‘लोकमत’ सोबत शेअर क रत आहे. त्यामुळे एका आठवडयात दोन तमीळ गाणी रिलीज झाल्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे.* सध्या छोटया पडद्यावर संगीतावर आधारित अनेक शोज सुरू आहेत. काय वाटतं की, अशा शोजमधून खरं टॅलेंट बाहेर येतं का?- कुठल्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होताना जे दडपण असतं त्याहीपेक्षा जास्त हे त्या शोमधून बाहेर पडल्यावर असतं असं मला वाटतं. कारण, शोमधील ग्लॅमर आणि यश हे तात्पुरतं असतं असं मला वाटतं. तिथून बाहेर पडल्यावर खरा चॅलेंजिंग प्रवास सुरू होतो. तुम्ही हे यश टिकवून कसं ठेवता? आयुष्यात त्याचा वापर कसा करून घेतो? यावर तुमचं यश अवलंबून असतं. * संगीताच्या क्षेत्रातही आज स्पर्धा वाढली आहे, अनेक आधुनिक साधनं उपलब्ध झाली आहेत. तरीही या क्षेत्रात काम करताना किती आव्हान वाटतं?- नक्कीच. संगीताच्या क्षेत्रात आज कितीही आधुनिकता निर्माण झाली असेल तरीही या क्षेत्रात काम करताना आव्हान हे वाटतंच. त्यामुळेच तर मी यूट्यूबवर माझी काही सिंगल्स सुरू केली, चाहत्यांसमोर वेगवेगळे प्रयोग करत मी कायम त्यांना माझ्या गाण्यांची ओळख करून देत असते. * संगीताची तुझी व्याख्या काय? संगीत तुझ्यासाठी काय आहे?- संगीत म्हणजे माझं आयुष्य आहे. आणि माझं आयुष्य म्हणजेच संगीत आहे. संगीत जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी काय केलं असतं असं मला कधीकधी वाटतं. संगीतानं माझं आयुष्य भरून गेलं आहे. संगीतच माझा श्वास आहे, असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही.* जुन्या गाण्यांच्या अवीट गोडीसमोर सध्याच्या गाण्यांचं लाईफ कमी आहे, असे वाटते का?- जुनी गाणी आजही आपण मोठ्या आवडीने आणि आनंदाने ऐकतो. युवापिढी देखील रॉक संगीत ऐकत असली तरीही जुन्या गाण्यांचा संग्रह तर त्यांच्याकडेही आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील ताण-तणाव आपण हीच गाणी ऐकून कमी करतो. याउलट नवी गाणी अगदीच वाईट नाहीत. पण, काही गाणी कायम स्मरणात राहण्यासारखीही आहेत.