Join us  

‘माझा एल्गार’ १० नोव्हेंबरला चित्रपटगृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 8:58 AM

वास्तवाशी भिडणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. समाजात वावरत असताना सर्जनशील वा संवेदनशील व्यक्तींना जाणवणाऱ्या अनेक विषयांना ...

वास्तवाशी भिडणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. समाजात वावरत असताना सर्जनशील वा संवेदनशील व्यक्तींना जाणवणाऱ्या अनेक विषयांना यामुळे चित्रपटामध्ये स्थान मिळाले आहे. अपप्रवृत्ती विरोधातील लढा दाखवताना एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा मिलिंद कांबळे दिग्दर्शित ‘माझा एल्गार’ हा मराठी  चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या सद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ या चित्रपटाची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून श्रीकांत आपटे प्रस्तुतकर्ते आहेत.श्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्यावर ‘माझा एल्गार’ हा चित्रपट भाष्य करतो. गावातल्या एका अपप्रवृत्तीच्या महंता विरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा दाखवतानाच तरुणाईने मनात आणलं तर ते समाजात नक्कीच चांगला बदल घडवू शकतील हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा धूर्त महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष यात पहायला मिळेल. या संघर्षात तरुणीला कोणाकोणाची साथ मिळेल? व हा लढा ती कशाप्रकारे लढेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’  मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना...अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.ऐश्वर्या राजेश  व यश कदम या नव्या जोडीसोबत स्वप्नील राजशेखर, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहे. संगीत सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबर्डे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ चित्रपटगृहात दाखल होईल.