नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' (Sairat) चित्रपटात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सुरज पवार (Suraj Pawar) काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सूरजची सहा तास चौकशी केली होती. दरम्यान या प्रकरणावर अखेर सूरज पवारने चुप्पी तोडली आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्याची मानहानी केल्याचे म्हटले आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे असे सूरजने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सुरज पवार याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, नमस्कार. मी सुरज पवार, गेली दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली. किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच मिडीयांनी माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहूरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलीसांसमोर सर्व कागदपत्रासह माझे म्हणने नमूद केले. त्यानंतर वेळोवेळी राहूरी पोलीस सांगेल त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहील्यांदा हजर राहीलो आणि बाहेर मिडीयात 'प्रिन्सला पोलीसांनी केली अटक ! प्रिन्स खाणार जेलची हवा ! प्रिन्स अखेर जेरबंद ! या अशा मधळ्याच्या बातम्या देवून प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, कुठलीही शहानिशा करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं. खरे पहाता राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहीलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते.
त्याने पुढे म्हटले की, राहूरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्याबाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतून ठेवून माझे नाव घेतले होते हे पोलिसांसमोर सिद्ध झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडेसाहेब आणि श्री. सज्जनकुमार नऱ्र्हेडा आणि पोलीस टिमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं "किटाळ" एकदाचं संपलं.