Join us

बॉईज या चित्रपटाच्या यशाचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 4:48 AM

सैराट’च्या प्रचंड यशानंतर तब्बल दीड वर्षानंतर बॉईज या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आणि अजूनही सलग चौथ्या आठवड्यात ...

सैराट’च्या प्रचंड यशानंतर तब्बल दीड वर्षानंतर बॉईज या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आणि अजूनही सलग चौथ्या आठवड्यात थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत. कॉलेजवयीन प्रेक्षकवर्गाचा विचार करून हा चित्रपट तयार करण्यात आला होता आणि त्या प्रेक्षकवर्गाला आवडेल त्या पद्धतीने चित्रपट सादर करण्यात आला. त्यामुळेच या चित्रपटाने प्रचंड यश संपादन केले. हा चित्रपट यशस्वी करण्याचा मार्ग बॉईजचे निर्माते राजेन्द्र शिंदे, दिग्दर्शक विशाल देवरूखकर आणि प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते यांनी आखला आणि यश मिळाले. पण या सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो चित्रपट वितरणाचा… जे मराठी चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचे आणि कठीण आहे. ती जबाबदारी पिकल एंटरटेनमेन्टच्या समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी यांनी समर्थपणे पेलली. त्यामुळे बॉईजच्या यशात पिकल एन्टरटेनमेन्टच्या वितरण प्रणालीची मोठी भूमिका आहे.“चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमुक एका वाहिनीवरच्या तमुक कार्यक्रमात कलाकार गेले की, चित्रपटाची प्रसिद्धी होते आणि ठराविक एका वितरकामार्फत वितरण केले तसेच ठराविक चित्रपटगृहात सिनेमा लागला की चित्रपट सुपरहीट ठरतो. अशा तथाकथित प्रसिद्धी आणि वितरण व्यवस्थेला फाटा देत बॉयजने घवघवीत यश संपादित केले आहे. याचा पिकल एन्टरटेनमेन्टला मनस्वी आनंद आहे. कारण प्रस्थापित व्यवस्थेला फाटा देत वेगळ्या वाटा चोखाळून आम्ही रणनिती आखली आणि त्याला निर्माते राजेन्द्र शिंदे तसेच प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते यांनी योग्य साथ दिली. त्यामुळे बॉईज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि नियोजन यशस्वी करणे शक्य झाले,” असे पिकल एन्टरटेनमेन्टचे समीर दिक्षीत यांनी सांगितले.८ सप्टेंबर रोजी बॉयज महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्या आठवड्यात ३०० सिनेमागृहात ४५३२ शोज तर दुसऱ्या आठवड्यात ३५० थिएटर्स मध्ये ५२५० शोज आणि तिसऱ्या आठवड्यात २५० थिएटर्समध्ये २८०० शोज् मिळाले. साधारणत: पहिल्या आठवड्यानंतर शोज् आणि थिएटर्स कमी होतात. परंतु बॉयजने हे गणितही मोडून काढले आणि दोन आठवड्यातच १० कोटींच्या वर गल्ला जमवला. अजूनही हा चित्रपट सिनेमागृहात इतर सर्वभाषिक चित्रपटांना टक्कर देत प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे. Also Read : 'बॉईज' सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा