एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये हा मराठी अभिनेता दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:37 PM2018-08-16T15:37:59+5:302018-08-17T08:00:00+5:30
तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर चित्रपट बनत असून यात आता हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम करणारे अभिनेता सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये पार पडते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर राजकीय नेते भास्करराव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत त्यांनी सचिन खेडेकर खूप उत्सुक असून ते एका वृत्तपत्राला म्हणाले की,' ही खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे. एनटीआर यांच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री पद पटकावलेले आणि मग एनटीआर यांनी बाजी उलटवलेले राजकीय नेते भास्करराव ही व्यक्तिरेखा मी यात साकारतोय. ही भूमिका साकारण्यासाठी काही महत्त्वाचे संदर्भ आणि छायाचित्रे मला दिली गेली. त्यांचे निरीक्षण, अभ्यास, वाचन मी करतो आहे. त्याशिवाय ही व्यक्तिरेखा सापडणार नाही. पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा देखील महत्त्वाची आहे.'
एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या बालन साकारताना दिसणार आहे. एनटीआर यांचा मुलगा नंदमुरी बालाकृष्णन चित्रपटात आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. रवि किशन रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. तसेच नंदमुरी बालाकृष्णन, विद्या बालन रवी किशन यांच्यासोबत बाहुबली फेम राणा दुग्गाबत्तीदेखील या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या चित्रपटात आणखीन कोण-कोण कलाकार पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.