Join us

प्रेमात जो आडवा येणार त्याला उभा फाडणार! किरण गायकवाडच्या 'नाद-द हार्ड लव्ह'चा भन्नाट ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 1:03 PM

किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेल्या नाद सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय (naad, kiran gaikwad)

मराठी चित्रपटांमध्ये लवकरच रांगड्या प्रेमाची भन्नाट कथा बघायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाचं ना म्हणजे 'नाद - द हार्ड लव्ह'. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह'च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन होणार हे नक्की.

'नाद - द हार्ड लव्ह'चा ट्रेलर

'नाद - द हार्ड लव्ह' हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे. प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अ‍ॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही. आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील.

हे कलाकार 'नाद'मध्ये दिसणार

'देवमाणूस' फेम किरण गायकवाड या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असून, त्याचे आजवर कधीही समोर न आलेले रांगडे रूप यात पाहायला मिळणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने हि नवोदित अभिनेत्री असल्याने नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्रीही लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांच्या जोडीला यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

'नाद' कधी रिलीज होणार?

गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांच्या लेखणीतून अवतरलेली 'नाद' सिनेमातील गाणी सुप्रसिद्ध संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमॅटोग्राफर अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांचे आहे. वेशभूषा निगार शेख यांनी केली असून, कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रमेश शेट्टी, तर आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत. 

टॅग्स :किरण गायकवाडमराठी चित्रपट