'नाच गं घुमा' सिनेमाची सध्या सगळ्यांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेलर, टिझर आणि गाण्यांमधून सिनेमा रिलीजआधीच महाराष्ट्रातल्या घराघरात लोकप्रिय झालाय. 'नाच गं घुमा' टीमने प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी गप्पा मारल्या. त्यावेळी 'नाच गं घुमा' सिनेमाची कल्पना घरातूनच सुचली का? शिवाय घरातली मदतनीस गैरहजर असल्यावर नवऱ्यावर खापर फुटतं का? याविषयी 'नाच गं घुमा' च्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधला. काय म्हणाले हे दोघे.. वाचा सविस्तर..
मधुगंधा कुलकर्णींनी याविषयी त्यांच्या आयुष्यातल्या मोलकरणीचा अनुभव सांगितला. मधुगंधा म्हणाल्या, "नाचं ग घुमा सिनेमाच्या कथेची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या घरापासून झालीय. हा आपल्या रोजच्या आयुष्यातला आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे तो माझ्याच नाही आपल्या सगळ्यांच्या घरातला विषय आहे. माझ्याकडे मंजू ताई म्हणून 8 वर्ष काम करतात. खूप छान आहेत. हसऱ्या आहेत. त्या माझ्या हाऊस हेल्प नाही तर माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहेत. एकदा त्यांच्याकडून एक चूक झाली. त्या चुकीचा मागोवा घेत मला लक्षात आलं की, मी जशी वर्किंग वुमन आहे तशी त्या पण वर्किंग वूमनच आहेत. वर्किंग वूमनचं मराठीत भाषांतर कामवाली बाई असंच होतं. मला जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा मला वाटलं की हे लोकांसोबत शेयर केलं पाहिजे. मला आलेला अनुभव मांडला पाहिजे. त्यामुळे त्याची पटकथा, कथा, संवाद मी आणि परेशने लिहिले आणि हा चित्रपट घेऊन तुमच्यासमोर येत आहोत.
घरातली मदतनीस गैरहजर असल्यावर नवऱ्यावर खापर फुटतं का? यावर सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, "सगळ्या महाराष्ट्रातल्या घरात जसं आहे तसंच ते माझ्या घरात आहे. आणि म्हणूनच माझा प्रतिनिधी म्हणून सारंग साठे त्या भूमिकेत तुम्हाला दिसेल. कारण सगळी खापर आणि मडकी फुटतात ती आमच्या डोक्यावर फुटतात. आणि सगळ्या कुटुंबाची साहसकथा होऊन बसते." 'नाच गं घुमा' सिनेमा १ मे २०२४ ला रिलीज होत असून सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.