Join us

​ ‘नागपूर अधिवेशन’ होणार आता सिनेमागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 2:09 PM

दरवर्षी भरणारे नागपूर अधिवेशन एक सरकारी सहलच झाली आहे. या काळात एक वेगळेच नागपूर विधानभवनाबाहेर पाहायला मिळते. राज्याचे विषय, ...

दरवर्षी भरणारे नागपूर अधिवेशन एक सरकारी सहलच झाली आहे. या काळात एक वेगळेच नागपूर विधानभवनाबाहेर पाहायला मिळते. राज्याचे विषय, त्यांच्या समस्या घेऊन तिकडे विधानसभेत अथवा विधान परिषदेत बोलणारी राजकारणी मंडळी, त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते, मोर्चे घेऊन येणारी मंडळी, अनेक आमदार- कार्यकर्ते मंडळी यांची स्वतःची स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरु असते. यावेळी घडणाऱ्या गमतीजमती एरवी कुठेच पाहायला मिळत नाहीत. ऐन थंडीत अधिवेशनाला जाण्याचा नेते मंडळींचा उत्साह व पिकनिक मूडमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती जास्तच बळावत चालली आहे. याचेच मार्मिक चित्रण अनिल केशवराव जळमकर निर्मित ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. निलेश रावसाहेब जळमकर लिखित- दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.  विदर्भ पिक्चर्स प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ चित्रपटातून या अधिवेशनाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. राजकारणापलीकडचे राजकीय रंग या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. अधिवेशनादरम्यान रंगणारा गप्पांचा राजकीय फड असो की राजकारण्यांची स्टाईल हे सगळंच या काळात खूप लक्षवेधी असतं. मंत्र्यांच्या सरबराईत इथला सरकारी कर्मचारी कसा त्रासून जातो आणि शेवटी करोडो रुपये खर्च करून पार पडणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशा अनेक बाबींवर या चित्रपटातून नेमकं भाष्य करण्यात आलंय. या चित्रपटाची सह-निर्मिती ययाति नाईक यांनी केली आहे.मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे या कलाकारांसह विनीत भोंडे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदी कलाकारांनी अफलातून भूमिका साकारल्या आहेत. गीतकार अनंत खेळकर, निलेश रावसाहेब जळमकर, अमोल ताले लिखित गीतांना अमित ताले यांनी संगीतबद्ध केलं आहे. पार्श्वसंगीताची साथ अमेय नारे, साजन पटेल यांनी दिली असून प्रसन्नजीत कोसंबी, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, शरद ताऊर यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. वेशभूषा संदीप जोशी, रंगभूषा निशिकांत उजवणे यांची तर छायांकन चंद्रकांत मेहेर यांनी केलंय. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.