सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या आगामी सिनेमा 'घर बंदुक बिरयानी'मुळे चर्चेत आहेत. नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणजे काहीतरी हटके असणारच हे ठरलेलं आहे. वेगळ्या धाटणीचा सिनेमा करणं अशीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमात कुठे ना कुठे गावाशी नाळ जोडलेली असते. अशा या अफलातून दिग्दर्शकावर पुढे कधी बायोपिक आलाच तर त्याचं काय नाव असेल याचं उत्तर स्वत: नागराज यांनीच दिलं आहे.
'घर बंदुक बिरयानी' निमित्त सध्या कलाकार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. सिनेमाबद्दल, कलाकारांच्या निवडीबद्दल तर सगळीकडेच चर्चा झाली आहे. 'इट्स मज्जा' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे यांना विचारण्यात आलं की, 'तुमच्यावर बायोपिक बनला तर त्याचं नाव काय असेल?' यावर नागराज म्हणाले 'याचं उत्तर खाजगीतच देईन' नंतर बराच विचार केल्यानंतर ते म्हणाले, 'भटक्या'.
नागराज यांच्या प्रत्येक सिनेमाचं नाव हे एकाच शब्दात असतं. मग त्यांचा पहिलाच सुपरहिट चित्रपट 'सैराट' असो किंवा 'नाळ', 'फँड्री','झुंड' हे सिनेमे असो. आता मात्र त्यांच्या आगामी चित्रपटाच्या टायटलमध्ये पहिल्यांदाच तीन शब्द दिसून येत आहेत. तर स्वत:वर बायोपिक बनलीच तर बायोपिकच्या टायटलचं उत्तरही त्यांनी 'भटक्या' असं एका शब्दातच दिलंय. 'घर बंदुक बिरयानी' येत्या ७ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. यामध्ये आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि स्वत: नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत आहेत.