२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'नाळ'च्या पहिल्या भागात 'चैतू'ची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली. आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला जाणार आहे. मात्र आता इतकी वर्षं झाल्यानंतर त्यांच्यातील हा दुरावा निवळेल का? चैतू त्याच्या आईकडे येईल का? त्यांच्यातील हा अबोला संपेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझर पाहाता चैतू त्याच्या आईबरोबर दिसत आहे, मात्र त्यांच्या नात्याची नाळ जुळली आहे का, हे अद्यापही अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.
‘नाळ भाग २’च्या पहिल्या टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भिंगोरी’ गाणेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. 'नाळ' ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता 'नाळ भाग २' लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ही नात्यांची नाळ अधिकच घट्ट होणार आहे.