'फॅंड्री' चित्रपटानंतर नागराज मंजुळे (Nagraj Manjule ) यांचा ‘सैराट’ हा सिनेमा आला अन् या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं. या सिनेमातील रिंकू व आकाशच्या अभिनयाची, नागराज यांच्या दिग्दर्शनाची, सिनेमातील गाण्यांची प्रचंड चर्चा झाली. 2016 मध्ये ‘सैराट’ प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं नागराज यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. तेव्हापासून नागराज यांचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. याच नागराज अण्णांनी तीनेक वर्षांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार होता. पण २०२३ साल उजाडलं, तरी हा सिनेमा रिलीज झालेला नाही. या सिनेमाचं नेमकं काय झालं, असा प्रश्न अण्णांच्या चाहत्यांना आजही पडतो. नुकत्याच एका मुलाखतीत नागराज यावर बोलले.महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केला.
तो सिनेमा...छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा नक्की येईल. कारण हा चित्रपट माझा ड्रिम प्रोजेक्ट आहे. पण शिवाजी महाराजांवरचा चित्रपट सर्वोत्कृष्ट व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मला या चित्रपटासाठी कुठलीही घाई करायखी नाही. सिनेमा करायचा म्हणून करायचा आणि मग मी केला, असं म्हणत मिरवायचं त्यापैकी मी नाही. हा चित्रपट केल्यानंतर काहीतरी भारी केल्याची भावना आयुष्यभर माझ्यासोबत राहायला हवी. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्यावर काम करतोय. माझ्यातलं १०० टक्के देऊन मला हा सिनेमा साकारायचा आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांवरचा हा सिनेमा आत्ता होईल की नंतर होईल, हे मला सांगता येणार नाही. पण हा सिनेमा नक्की होणार, एवढं मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो आहे. अर्थात मला घाई केली नाही. छत्रपतींवरचा सिनेमा आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे, तो तितक्याच जबाबदारीने पेलता यायला हवा, असं नागराज म्हणाले.
दरम्यान नागराज लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.