Join us

Nagraj Manjule : आत्मचरित्र लिहावं वाटलं तर लिहीन, पण...,  नागराज मंजुळेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:50 AM

Nagraj Manjule : नागराज अण्णांच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास बराच खडतर होता. त्यामुळे आत्मचरित्र लिहिण्याचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj  Manjule) यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ ( Ghar Banduk Biryani) हा सिनेमा येत्या ७ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात नागराज एका कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सध्या नागराज अण्णा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचनिमित्ताने नागराज यांनी एक माेठा खुलासा केला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना ते त्यांच्या आत्मचरित्रावर बोलले. अण्णांच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास बराच खडतर होता. त्यामुळे आत्मचरित्र लिहिण्याचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर नागराज यांनी मनमोकळेपणानं उत्तर दिलं.

सध्यातरी आत्मचरित्र लिहिण्याचा कोणताच विचार नाही. पण भविष्यात वाटलं तर नक्कीच लिहिन. मला वाटतं फॅन्ड्री आणि सैराट हे माझे दोन सिनेमे एकार्थाने माझं आत्मचरित्रच आहेत. या दोन्ही सिनेमांत मी व्यक्त झालो आहे. माझं व्यक्तिगत आयुष्य कोणापासूनही लपलेलं नाही, असं नागराज म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी अतिशय गरीब कुटुंबात नागराज यांचा जन्म झाला. जेऊर या गावात नागराज लहानाचे मोठे झालेत. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचा भाऊ बाबूराव यांनी नागराज यांना दत्तक घेतलं. नागराज यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी ते अनेकवेळा शाळेला देखील दांडी मारत असत. नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं. शालेय शिक्षणानंतर नागराज यांना काही मित्रांची वाईट संगत लागली. ते व्यसनांच्या ही आहारी गेलेत. मात्र, नंतर हे सर्व सोडून ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. याकाळात त्यांना पुस्तके वाचण्याचा आणि कविता लेखनाचा छंद लागला होता. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला गेले. नंतर त्यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल पूर्ण केलं. मात्र, चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. 'पिस्तुल्या' हा पहिला लघुपट त्यांनी साकारला. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. इथूनच खरं त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती.

टॅग्स :नागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट