सध्या मराठी कलाविश्वात आणि खासकरुन प्रेक्षकांमध्ये चर्चा होतीये ती नागराज मंजुळे यांच्या 'घर बंदूक बिरयानी' (ghar banduk biryani) या चित्रपटाची. नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या चित्रपटात कायमच काही तरी नवीन आणि वास्तवादी कथा पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या आगामी घर बंदूक बिरयानी या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. यामध्येच आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच या चित्रपटातील दोन गाणी आणि टीझर प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता यात ट्रेलरची भर पडली आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांमध्ये व्हायरल झाला.
काय आहे ट्रेलरमध्ये?
आशेच्या भांगेची नशा भारी, अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग असल्याचं दिसून येत आहे. परंतु, आता यांच्यात सुरु असलेली ही चकमक नक्की कशावरून आहे. आणि, 'घर, बंदूक आणि बिरयानी'चा याच्याशी नेमका काय संबंध, याचं उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे. मात्र, हे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचं दिसत असलं तरीदेखील त्यात एक कौटुंबिक कथा, प्रेमकहाणी असल्याचं दिसून येतं.
''अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे,'' असं नागराज मंजुळे म्हणाले.
दरम्यान, या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे. या चित्रपटाची प्रस्तुती झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी केली आहे. तर, आटपाट निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे.