‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. नागराज मंजुळेनेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा टीजर शेअर करत चित्रपटाविषयी माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज नव्हे तर सुधाकर रेड्डी करणार आहे.
माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय... नितीन वैद्य, विराज लोंढे, निखिल वराडकर आणि प्रशांत पेठे निर्माणातील सोबती आहेतच अशी फेसबुकवर पोस्ट लिहीत नागराजने नाळ विषयी सगळ्यांना सांगितले आहे.
‘नाळ’च्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. या टीजरला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेताही आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे तर ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटाद्वारे नागराजने समाजातील प्रश्न लोकांसमोर उभे केले आहेत. आता नाळ हा चित्रपट देखील एखाद्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. नाळ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळे सध्या झुंड या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपट बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर सध्या नागराज काम करत आहे.