'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule), आकाश ठोसर (Akash Thosar) आणि सयाजी शिंदे (Sayaji shinde) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ एप्रिलला रिलीज होतोय. टीझर व ट्रेलरनंतर या चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेच. आशेच्या भांगेची नशा भारी..., अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसते. नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा नेमका काय संबंध, याचं उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास प्रेक्षकही उतावीळ झाले आहेत. सिनेमाचं आगळं वेगळं नाव आणि त्यामागची स्टोरी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. नागराज मंजुळे यांनी अलीकडे एका मुलाखतीत या नावामागची गंमत सांगितली.महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांनी 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाच्या नावामागच कथा सांगितली. हे नाव कसं ठरलं, हे त्यांनी सांगितलं.
स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा...नागराज यांनी सांगितलं की, 'घर बंदूक बिरयानी'ची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा त्याचं नाव बिर्याणी होतं. म्हणजे, माझ्या इतर सिनेमासारखं फक्त एक अक्षरी नाव. हेमंतची ही मूळ कथा होती. मी या सिनेमात काम करावं आणि आवडली तर प्रोड्यूस करावं, अशी त्याची इच्छा होती. माझ्याकडे ही गोष्ट आली होती लॉकडाऊनच्या अगोदर. सुरूवातीला मला ती जरा आवडली नाही. बघू विचार करू, असं मी हेमंतला म्हणालो. माझा जो एक विशिष्ट स्वभाव आहे, त्यापेक्षा कथेत काहीतरी वेगळं होतं. मग आम्ही दोघांनी परत असं ठरवलं की आपण दोघांनी या सिनेमाची कथा लिहायची. मग मी लिहायला घेतलं आणि लिहिता लिहिता या सिनेमाचं नाव 'घर बंदूक बिरयानी' असावं, असं मला वाटलं. ही कथा बिर्यानीत मावत नाहीये, असं जाणवलं आणि मग 'घर बंदूक बिरयानी' हे शीर्षक ठरलं. 'घर बंदूक बिरयानी' ही तीन लोकांची गोष्ट आहे, हे तुम्ही पाहू शकतो. या नावामागचा नेमका अर्थ काय आहे, हे आत्ता सांगण्यात मजा नाही. ते सिनेमा पाहून समजण्यातच मजा आहे. मला वाटतं सिनेमा बघितल्यानंतर या शीर्षकाची सार्थकता तुम्हाला कळेलच.