मराठी रंगभूमीने आज अनेक कलाकार घडवले. त्यामुळेच आज रुपेरी पडद्यावर कलाकार मंडळी यशस्वीपणे वावर आहेत. यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी मालिका, सिनेमांमध्ये काम करुनही त्यांची रंगभूमीशी असलेली नाळ अद्यापही जोडून ठेवलेली आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे आनंद इंगळे. आजही ते वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
आनंद इंगळे यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं. यात लवकरच पुन्हा एकदा ते रंगमंचावर वावरणार आहेत. 'नकळत सारे घडले' या नाटकाच्या निमित्ताने ते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नाटकात ते अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
गेल्या काही काळामध्ये जुने ते सोने या उक्तीप्रमाणे काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नव्या संचात सादर केली जात आहेत. अशा या क्लासिक नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकवर्ग पुन्हा मराठी नाटकांकडे वळू लागला आहे. या यादीत शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नकळत सारे घडले’ या नाटकाचा समावेश झाला आहे. नवनित प्रोडक्शन्स निर्मित रूपकथा प्रकाशित ‘नकळत सारे घडले’ हे नव्या संचातील नाटक १ जूनला रंगभूमीवर दाखल होणार आहे.
दरम्यान, या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते आनंद इंगळे आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे हे दोन मातब्बर कलाकार रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. या दोघांसोबत प्रशांत केणी, तनिषा वर्दे आदी कलाकारांच्या त्यांच्यासोबत रंगमंचावर वावरणार आहेत. ‘नकळत सारे घडले’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे आहे. नेपथ्य राजन भिसे यांचे तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.