सध्या मराठी सिनेसृष्टीत परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' या चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे. चित्रपटाला समस्त महाराष्ट्रातून पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं प्रेक्षकांसह कलाकार मंडळी कौतुक करत आहेत. या सिनेमातील 'आशाताई' अर्थात नम्रता संभेराव यशाचा आनंद घेत असून प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यातच तिनं पती आणि गोंडस लेक रुद्राजला खास पोस्ट शेअर करत एक आश्वासन दिलं आहे.
नम्रता संभेरावनं सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, 'मेरे दो अनमोल रतन! ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाला हाऊसफुल्ल चालतोय…प्रेम मिळतंय फोन येत आहेत. कौतुक होतंय, सगळं छान घडतंय पण, माझ्या या दोन मुलांबरोबर आणि कुटुंबासह हा क्षण कधी एकदा अनुभवतेय असं झालंय. आम्ही सध्या चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना भेटत आहोत. त्यामुळे थोडं लांब आहोत. पण, नक्कीच लवकर ‘नाच गं घुमा’ बघू एकत्र…कारण, रुद्राज खूप जास्त उत्सुक आहे सिनेमा बघण्यासाठी आणि हे ऐकून मी जास्त खूश झाले आहे'.
नम्रता संभेरावच्या पतीचं नाव योगेश संभेराव आहे. योगेशदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नम्रताने मालिका, विनोदी कार्यक्रम नाटक, सिनेमे अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं आहे. नम्रता आणि योगेश यांना गोड मुलगा आहे. या मुलाचं नाव रुद्र आहे. नम्रता दोघांसोबतचे फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. नम्रताचं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.
'नाच गं घुमा' सिनेमात मुक्ता-नम्रता यांच्यासह सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा १ मे रोजी सिनेमागृहात दाखल झाला. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने चांगला गल्ला जमवला आहे. परेश मोकाशी यांच्या 'नाच गं घुमा' सिनेमाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि स्वत: परेश यांनी केले आहे. तर त्यांच्यासह स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.