Join us  

नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- "शरद पवारांचा फोन आला अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 3:39 PM

"कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर होती का?" असा प्रश्न नानांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना नानांनी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती, असं सांगितलं.

मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या आणि वर्षानुवर्षे अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे नाना पाटकेर. 'तिरंगा', 'क्रांतीवीर', 'अग्नीशक्ती', 'परिंदा', 'शक्ती', 'अंगार' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. नाना अभिनयाबरोबरच त्यांच्या स्वभावामुळेही चर्चेत असतात. नेहमीच ते परखडपणे त्यांची मतं मांडताना दिसतात. 

नानांनी नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीतही त्यांनी अगदी रोखठोक आणि दिलखुलासपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. या मुलाखतीतच नानांनी लोकसभेची ऑफर होती, असा खुलासा केला. "कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर होती का?" असा प्रश्न नानांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना नानांनी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती, असं सांगितलं. त्याबरोबरच शरद पवार यांनीदेखील फोन केल्याचा खुलासा त्यांनी केला. 

नाना म्हणाले, "मला आत्तापर्यंत सगळ्या राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या आहेत. पण, मी राजकारणात टिकू शकत नाही. माझ्या मनात येईल ते मी बोलतो. पक्षाच्या अध्यक्षाला मी जर 'तू पागल आहेस का?' असं म्हणालो. तर तो मला काढून टाकेल. मग राजकारणात जायचं कशाला? लोकसभा निवडणुकीसाठीदेखील मला विचारण्यात आलं होतं. शरद पवारांनी मला फोन केला आणि विचारलं की नाना तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहताय? मी त्यांना म्हणालो की असं असतं तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं असतं. खरं तर मला हे त्यांच्याकडूनच कळालं की मी लोकसभा निवडणुकीसाठी उभा आहे. मला तर हे माहितच नव्हतं. पण, अशा अफवा पसरत असतात". 

लोकसभा निवडणुकीत नाना पाटेकर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शिरुर मतदारसंघातील निवडणुक लढवणार अशा चर्चा रंगल्या होत्या. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे या चर्चा रंगल्या होत्या. शिरुर मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढवत अमोल कोल्हे निवडूण आले आहेत.  

टॅग्स :नाना पाटेकरशरद पवारमराठी अभिनेतालोकसभा निवडणूक २०२४