Join us

या जवानाचा व्हीडीओ पाहून काय बोलले नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 12:17 PM

 एका भारतीय जवानाने व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेमुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) या जवानाने कर्तव्य ...

 एका भारतीय जवानाने व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेमुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) या जवानाने कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे वाईट वागणूक दिली जाते, याचा पाढा व्हिडिओत वाचला आहे. या व्हिडिओत जवानाने त्यांना दररोज पुरेसे आणि चांगले अन्न मिळत नसल्याचे म्हटले. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्यावर उपाशीपोटी झोपायची वेळ आल्याचेही त्याने म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा चीड आणणारा भ्रष्टाचाराचा प्रकारही समोर आला आहे. याशिवाय, सीमेवर कार्यरत असताना जवानांना अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतो, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पाटेकर यांनी जम्मू काश्मीरमधील सीमा रेषेवरील हिरानगर, कठुआ या भागामध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाशी संवाद साधला होता. आता तेज बहादूर यादवच्या व्हिडीओ प्रकरणावरही नानांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेज बहादूरने जवानांना मिळणा-या सुमार दर्जाच्या जेवणाची व्यथा व्हिडीओतून मांडली होती. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना नाना म्हणाले की, ‘मी कमांडर कमल नयन चौबे यांच्यासोबत संपर्क साधला आहे. हा जो प्रकार सर्वांसमोर उघड झाला तो चुकीचाच आहे. कारण, हे जवान मग ते कोणतेही असो. अगदी बीएसएफ, सीआरपीएफ, किंवा आयटीबीपीमधील जवान असो ते स्वत:च्या मुलांपेक्षाही जास्त देशवासीयांच्या संरक्षणासाठी झटतात. या प्रकरणात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मी सविस्तर बोलू शकेन कारण सध्या यासंबंधीचा तपास आणि कारवाई सुरु आहे. पण, हे जवानांचे खच्चीकरण आहे’, अशा शब्दांत नानांनी त्यांचा संताप व्यक्त केला.दरम्यान, या व्हिडिओसंबंधी बोलताना नाना म्हणाले, की ‘मी ते व्हिडिओ पाहिले. पण, माझ्या माहितीनुसार त्या जवानाचीही चौकशी सुरु आहे. मी त्याबद्दल फारसे काहीच बोलू शकणार नाही. बीएसएफ आणि सीआरपीएफचे चे जवान आपले जवान आहेत. ते सर्वच आपले संरक्षण करतात. त्यामुळे त्यांच्यासंबंधी काहीही बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे’. नाना पाटेकर नेहमीच अशा संबेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर प्रतिक्रिया देताना सदर प्रकरणाचा सांगोपांग विचार करुनच त्यांची प्रतिक्रिया देतात. सध्या तेज बहादुर यांचा हा व्हिडिओ अनेक ठिकाणी शेअरही करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातून त्यासंबंधी संतप्त प्रतिक्रियांचे वारे वाहत आहेत.