नाना म्हणतात झोपेसाठी मला दारुची गरज लागत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 3:12 PM
नाना पाटेकर यांचे व्यकितमत्वच एकदम भारदस्त आहे. नानांनी नुकताच एक खुलासा केला आहे. काही दिवसांपुर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ...
नाना पाटेकर यांचे व्यकितमत्वच एकदम भारदस्त आहे. नानांनी नुकताच एक खुलासा केला आहे. काही दिवसांपुर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना सांगता की त्यांना झोपण्यासाठी दारुची गरज लागत नाही. होय, स्पष्टवक्त्या नानांनी असे बोलुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नाना सांगतात, मोकळा वेळ आहे ना झोपू या असं माज्या मनात अजिबात येत नाही. रात्री पडल्या पडल्या एका क्षणात मला झोप लागते. त्यासाठी दारू प्यावी लागत नाही. सिगारेटने मला त्रास व्हायला लागला. दिली एके दिवशी फेकून. त्याला आज पाच वर्ष झाली. एकेकाळी मी दिवसाला साठ सिगारेट ओढायचो. व्यायाम मी रोज दोन तास करतोच करतो. अजून एकावेळी दोन-तीन माणसं आली, तर मी अंगावर घेऊ शकतो. तेवढी ताकद आहे. रस्त्यात एखादी घटना घडली तर गाडी थांबवून तिथे जायची शामत आहे माझी. कारण तिथे जरी मी पडलो, धडलो, लागलं, हात तुटला, डोळा फु टला तर मला त्याची पत्रास नाही. कारण ती माझी गरज आहे. त्यांची आहे की नाही माहीत नाही, पण माझी आहे आणि जोपर्यंत ही गरज आहे तोपर्यंत मी नट म्हणून जिवंत आहे, ज्या दिवसापासून ती संपेल तेव्हापासून माझं जिवंत मरण सुरू होईल. मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो आहे. वडासारखं असलं पाहिजे. कुठे रुजलं आहे तेच कळत नाही, पारंबीचाही वृक्ष होतो तसं माझं झालं. म्हणजे जे.जे.मधून बाहेर पडलो. मग बाबा आमटे आल्यानंतर वेगळं झालं किंवा प्रहार चित्रपटाची गोष्ट डोक्यात असताना आर्मीत प्रवेश करावासा वाटला.. मग तीन वर्ष तिथे होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला काय पाहिजे आहे, ते समजलं.