चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीत वितरण करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले असून दिल्लीमध्ये या पुरस्काराचे वितरण नुकतेच पार पडले. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते बालकलाकार श्रीनिवास पोकळेने. श्रीनिवासला नाळ या चित्रपटातील चैत्या या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्काराने गौरवण्यात आले.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सोनाली कुलकर्णी आणि दिव्या दत्ता यांनी केले. त्यांनी श्रीनिवास यांच्या नावाची घोषणा करताच श्रीनिवास व्यसपीठाच्या दिशेने आला. त्याने तिथे सगळ्याच पहिल्यांदा व्यसपीठाच्या पाया पडल्या. श्रीनिवासला पुरस्कार देण्यात आला त्यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यांच्या हस्ते श्रीनिवासला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार घेतल्यानंतर श्रीनिवासने क्षणाचाही विलंब न करता व्यंकय्या नायडू यांच्या पाया पडल्या. या त्याच्या कृतीने त्याने उपस्थितांची मनं जिंकली.
नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नाळ’च्या सुधाकर रेड्डी यांनी पटकावला. यासोबतच श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.