'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धीझोतात आणलं होतं. अरुधंती ही तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी साधा, सरळ स्वभाव आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द असलेली अरुंधती प्रेक्षकांना भावली होती. मधुराणीने अगदी याउलट भूमिका 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात साकारली होती. या सिनेमात ती व्हिजेच्या भूमिकेत दिसली होती. आता 'नवरा माझा नवसाचा २'च्या निमित्ताने मधुराणीने तिच्या या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.
'नवरा माझा नवसाचा' सिनेमात कंडक्टर लालूच्या बाजूला बसून हातात ब्रश घेऊन प्रवास करणाऱ्या व्हिजेने प्रेक्षकांना खूप हसवलं होतं. पण, 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात मधुराणीला ही भूमिका कशी मिळाली, हे तुम्हाला माहितीये का? राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने याबद्दल खुलासा केला आहे. "मी मुंबईत आले तेव्हा अनेक स्वप्न उराशी घेऊन आले होते. त्यावेळी मी एक मालिका केली होती. त्यानंतर लगेचच मला 'नवरा माझा नवसाचा'सारखा सिनेमा मिळाला. मी स्वत: सचिन सरांकडे गेले होते. त्यानंतर व्हिडे ही भूमिका मला मिळाली. या भूमिकेसाठी मी जे इंग्रजी बोलले तसं इंग्रजी माझ्या बहिणीची मुलगी म्हणायची. तेच मी माझ्या भूमिकेसाठी वापरलं. पहिल्याच दिवशी मी सीन दिला तेव्हा सचिन सरांनाही ते आवडलं होतं. संपूर्ण चित्रपटात मी तीच भाषा बोलले आहे", असं मधुराणीने सांगितलं.
या सिनेमात मधुराणी तिच्या हातात असलेल्या एका ब्रशचा माईक म्हणून वापर करत असल्याचं दिसलं होतं. हा ब्रशही तिनेच विकत घेतल्याचा खुलासा मधुराणीने केला. ती म्हणाली, "माईक म्हणून मी जो हेअरब्रश वापरला होता तो मी स्वत: दादरला जाऊन माझ्या हातात मावेल असा घेतला होता. अशोक मामांच्या बाजूला बसून काम करण्यासाठी मला फारच दडपण आलं होतं. लहानपणी त्यांचे सिनेमे बघणे ते त्यांच्याबरोबर काम करणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढी मोठी कलाकार असूनही त्यांनी मला सांभाळून घेतलं. जेव्हा रीमाताईंची एन्ट्री झाली. तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच बसले. सोनू निगमसारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करणं. म्हणजे इंडस्ट्रीत येताच माझ्यासमोर पंचपक्वानांचं ताट वाढल्यासारखं झालं होतं. सुप्रियाताई-सचिन सर खूप सपोर्टिव्ह आहेत".
"ज्यावेळी आई कुठे काय करते ही मालिका आली. तेव्हा मीच 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हिजे आहे, हे लोकांनी ओळखलं. 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये मी नाहिये. पण, यानिमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या", असंही पुढे मधुराणीने सांगितलं.