महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं आज सकाळी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याचे कौशल्य अफलातून होते. मुळातले ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:च्या कलेला व्याप्त स्वरूप दिले. ज्यामुळे महाराष्ट्राला एक नवा लोककलावंत मिळाला, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी दिली. छगन चौगुले यांनी अनेक कुलदेवतांची गाणी आणि लोकगीते गायली आहेत.
छगन चौगुले यांनी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांसारखे कार्यक्रम सादर केले. घरोघरी त्यांच्या दोन तीन कॅसेट हमखास असायच्याच. खंडेरायाची गीतं, बाळू मामाची कथा, अंबाबाईची कथा, कथा भावा भावाची, कथा बहीण भावाची अशा लोककथांच्या त्यांच्या अनेक कॅसेट प्रसिद्ध होत्या. पुढे त्यांनी सिनेमांसाठीही पार्श्वगायन केलं. मात्र, छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली ती 'खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमात 'नवरी नटली' हे गाणे वाजवले जाते. त्यांना २०१८ साली लावणी गौरव पुरस्कार मिळाला होता.